Goa Casino: मांडवी नदीत आणखी एक मोठी कॅसिनोवाहू नौका लवकरच दिसू शकेल. सध्या असलेल्या ‘डेल्टीन रॉयल’पेक्षा दुप्पट आकाराची ही कॅसिनोवाहू नौका असेल. विद्यमान ‘डेल्टीन रॉयल’वर एकावेळी एक हजारजण गेम्समध्ये सहभागी होऊ शकतात.
नव्या नौकेत ही क्षमता दुप्पट असेल. 1 लाख चौरस फूट आकाराची ही नवी नौका असेल, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. नव्या नौकेसाठी परवाने मिळवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
कॅसिनोमधील आर्थिक उलाढालीवर 28 टक्के वस्तू व सेवा कर लागू करण्यात आला आहे. त्यामुळे कॅसिनो चालवणाऱ्या कंपन्यांच्या नफ्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळेच अनेक कंपन्या कॅसिनोवाहू नौकांचा आकार वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत.
मध्यंतरी हे कॅसिनो धारगळ परिसरात हलवण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, पेडणे तालुक्यातून त्याला मोठा विऱोध होऊ लागल्याने मांडवीतच कॅसिनोवाहू नौका असतील, असे कंपन्यांनी गृहीत धरले आहे. त्यामुळे मोठ्या नौका आणण्यासाठी कंपन्यांनी गुंतवणूक करण्याची तयारी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.
1 ऑक्टोबरपासून जीएसटी लागू झाल्यानंतर कंपन्यांनी उलाढाल आणि नफ्याचा आढावा घेत उलाढाल वाढवण्याचे ठरवले आहे. यासाठी क्षमतावृद्धी करण्यात येणार आहे.
पर्यावरण अहवालानंतरच दिले दाखले
गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकऱणाने मांडवीतील सहा कॅसिनोवाहू जहाजांना ना हरकत दाखले दिले आहेत. पर्यावरण घात मूल्यांकन अहवाल केल्याशिवाय असे दाखले दिल्याबद्दल माहिती हक्क कार्यकर्ते काशिनाथ शेटये यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे याला आव्हान दिले होते.
त्यावेळी लवादाने असा अहवाल घेऊनच दाखले द्यावेत, असे नमूद केले होते. त्यानुसार कंपन्यांनी अहवाल सादर केल्यानंतर दाखले देण्याची प्रक्रिया प्राधिकऱणाने सुरू केली होती. हंगामी दाखले दिल्यानंतर केलेल्या पाहणीनंतर आता दाखले जारी करण्यात आले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.