Anil Kakodkar: जगातिक स्तरावर ज्ञानाच्या दृष्टीने भारतीय पूर्ण सक्षम आहेत. त्यामुळे भारत इतर राष्ट्रांपेक्षा तुलनात्मकदृष्ट्या फारच श्रेष्ठ आहे, हे नाकारता येणार नाही. पुरातन काळापासून भारतीय वैज्ञानिक दृष्टीने ज्ञानी आहेत.
जर भारतीयांनी विज्ञान व तंत्रज्ञानाची योग्य सांगड घातली तर देश आपले गतवैभव मिळवू शकेल व जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचू शकेल एवढी ताकद भारताकडे असल्याचे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी गोमंत विद्या निकेतनच्या 21व्या विचार वेध व्याख्यान मालिकेतील दुसरे पुष्प गुंफताना केले.
नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात मुलांना त्यांच्या स्वत:च्या कौशल्याने, बुद्धिमत्तेने शिकण्याची मोकळीक देण्यात आली आहे. पण हे धोरण अंमलात येईल का, हा प्रश्र्न उपस्थित होतो. मुलांवर स्वत:च्या आवडी-निवडी लादू नका.
त्यांचे कौशल्य जाणून घेऊन त्यांना त्याकरिता मदत करा. त्यांच्यावर दबाव आणून त्यांच्याकडून मनाविरुद्ध गोष्टी करून घेऊ नका. त्यांना त्यांच्या मार्गाने जीवनात पुढे जाण्याची संधी द्या, असे आवाहन डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.
इतरांपेक्षा विविधता दाखवावी
भारताने अणु, क्षेपणास्त्र, अंतराळ उपग्रह यासारख्या वैज्ञानिक क्षेत्रामध्ये चांगली प्रगती केली आहे. पण आज जगात जी विकसनशील राष्ट्रे आहेत, त्यापेक्षा भारताची पातळी पुष्कळ खाली आहे व ती भरून काढणे गरजेचे आहे.
भारताने सांस्कृतिक क्रांतीबरोबरच विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये इतर देशांपेक्षा विविधता दाखविली पाहिजे, असे डॉ. काकोडकर यांनी सुचविले. उद्या पत्रकार राजदीप सरदेसाई ‘75 वर्षांतील भारतीय क्रिकेटबद्दल’ आपले विचार मांडणार आहेत.
आम्ही आमची विद्वत्ता भारताच्या भल्यासाठी न वापरता इतर देशांच्या मागणीनुसार वापरू लागलो आहोत. त्याचसाठी अमेरिका व इतर देशांमध्ये भारतीयांना जास्त मागणी आहे. भारतीय स्वत:ला इतरांपेक्षा वेगळा, असे समजतो.
पण जेव्हा इतर देशांमध्ये दर्जेदार शोध होतात तेव्हा आम्ही मागे पडतो. अशा परिस्थितीत भारतीयांनी त्यांच्याकडे सहयोग केला पाहिजे. त्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक तंत्रज्ञानावर जास्त भर देणे फायद्याचे ठरणार आहे.- डॉ. अनिल काकोडकर, पद्मविभूषण
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.