Amit Shah In Goa: देशातील उत्तर पूर्व भागातील अल्पसंख्यबहुल राज्यांत भाजपची सत्ता आहे. एकवेळ काँग्रेसकडे असलेली ही राज्ये आता भाजपकडे आली, यातच देशवासीयांना बदल हवा आहे, हे स्पष्ट होते.
गोव्यातही आगामी लोकसभा निवडणुकीत पन्नास नव्हे तर शंभर टक्के निकाल अपेक्षित आहे. त्यामुळे दक्षिण गोव्याच्या भाजप उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करा, अशी हाक केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी आज दिली.
फर्मागुढी-फोंड्यात भारतीय जनता पक्षाने केंद्रीय मंत्री अमित शहा यांची जाहीर सभा आयोजित केली होती. प्रचंड जनसमुदाय असलेल्या या सभेच्या माध्यमातून शहा यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे बिगूल फुंकले.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मंत्री विश्वजीत राणे, रवी नाईक, सुभाष शिरोडकर, माविन गुदिन्हो, नीळकंठ हळर्णकर, गोविंद गावडे, रोहन खंवटे, आमदार दिगंबर कामत, आमदार संकल्प आमोणकर, आमदार दिव्या राणे यांच्यासह इतर सत्ताधारी आमदार, माजी आमदार व भाजपचे नेते, ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
शहा म्हणाले..
काँग्रेसने गोव्याला वर्षाकाठी केवळ 432 कोटी रुपये दिले. भाजप तीन हजार कोटी देत आहे. गोव्यासाठी केंद्राची सजगता यातून स्पष्ट होते.
स्वयंपूर्ण गोव्याच्या माध्यमातून सरकारी योजना घरापर्यंत पोचवण्यासाठी दहा सूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी गोवा सरकारने केली.
देशाचा विकास हा केवळ भाजपच करू शकतो. म्हणून लोकसभा निवडणुकीत भाजपला विजयी करून देशाचे हात बळकट करावे.
निवडणुकीतच दिसतात काही पक्ष...
राज्यातील अनुसुचित जमातीला 2027 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आरक्षण देणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या भाषणात केला. आदिवासी अर्थातच एसटी समाजाने विधानसभा निवडणुकीत आरक्षण देण्यासंंबंधीचा विषय लावून धरला आहे.
यावर मुख्यमंत्र्यांनी 2027 पूर्वी हा प्रश्न सुटेल असे सांगितले. तसेच निवडणूक जवळ आली की अळंब्याप्रमाणे राजकीय पक्ष गोव्यात उगवतात आणि मग नाहिसे होतात, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
मगोचे सुदिन ढवळीकर व्यासपीठावर!
मगो पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांनी व्यासपीठावर येऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्यासमवेत मांद्रेचे मगो पक्षाचे आमदार जीत आरोलकर हेही व्यासपीठावर दाखल झाले.
ढवळीकर यांनी व्यासपीठावर पाऊल ठेवताच दुसऱ्या रांगेत बसणे पसंत केले. पण सूत्रसंचालक दामू नाईक यांनी सुदिनना पहिल्या रांगेत बसण्याची विनंती केली आणि एकापरीने भाजपने मगो नेत्याला मानाचे स्थान दिले.
म्हादईविषयी चकार शब्दही नाही!
सध्या गोव्यातील ज्वलंत विषय असलेल्या म्हादईसंबंधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक शब्दही काढला नाही. वास्तविक या सभेतून गोमंतकीयांना म्हादईसंबंधी शहा आश्वस्त करतील, अशी आशा होती.
शहा यांनी कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील आपल्या भाषणात म्हादईसंबंधी कर्नाटकला झुकते माप दिले होते. पण आजच्या सभेत म्हादईवर बोलणे टाळले गेल्याने गोमंतकीयांची निराशा झाली आहे.
केंद्राचे मानले आभार
आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोव्याच्या उपक्रमातून गोवा राज्य समृद्ध करण्यास भाजप सरकार कटीबद्ध असून पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ व स्वस्थ भारताची संकल्पना राबवताना राज्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे. आम्ही केंद्राचे आभारी आहोत.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
खाणींचा मार्ग सूकर
राज्यातील बंद असलेल्या खनिज खाणी वर्षभरात पुन्हा सुरू होणार आहेत. दहा वर्षे बंद असलेल्या खाणींचा विषय सुटला असून खाण ब्लॉक्सचा लीलावही झाला आहे. त्यामुळे खाणी सुरू होण्याचा मार्ग सूकर झाल्याचे अमित शहा म्हणाले.
रवींचे मिश्कील भाषण
रवी नाईकांचे भाषण म्हणजे काही औरच प्रकार असतो. रवींचे भाषण म्हटल्यावर काही तरी मनोरंजनात्मक ऐकायला मिळेल, अशी अटकळ प्रेक्षकांनी बांधलेली असते. त्याचा प्रत्यय भाजपच्या या जाहीर सभेतही आला.
वास्तविक भाजपची ही जाहीर सभा. त्यामुळे गर्दीही बरीच मोठी. नेमक्या याच गोष्टीचा लाभ घेत रवी नाईक यांनी आपले मनोरंजनास्त्र काढले. ‘जय सीयाराम’ अशी घोषणा देतानाच त्यांनी आपल्या मिश्कील भाषणात सर्वांना हसवले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.