Goa Politics: खरी कुजबुज; पालेकरांचा थेट ‘स्पा’मध्ये फोन

Khari Kujbuj Political Satire: परवा तेथील सरकारी मल्टिपर्पज शिक्षण संकुलात दहावीच्या वर्गात शिक्षण घेणा-या एका विद्यार्थ्याला बारावीत शिकणा-या विद्यार्थ्यांनी जी जबर मारहाण केली त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांचे पालक धास्तावले आहेत.
Goa Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

पालेकरांचा थेट ‘स्पा’मध्ये फोन!

राज्यात वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटना आणि ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेवर आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी पणजीतील वाढलेल्या ‘स्पा’च्या संख्येवर बोट ठेवले. या ‘स्पा’मध्ये रात्री उशिरापर्यंत काय चालते याविषयी यापूर्वी अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पणजीतील ‘स्पा’ची संख्या सांगण्यासाठी बाजूला बसलेले परब गुगल सर्च करीत असतानाच पालेकरांनी थेट पत्रकार परिषदेतच मोबाईलवरून एका ‘स्पा’मध्ये फोन केला. तेथील सेवेविषयी माहिती घेण्याचा त्यांचा प्रयत्न. त्यावर पलिकडून तुम्ही थेट ‘स्पा’मध्ये या म्हणून सांगण्यात आले, हे त्यांनी सर्वांना ऐकवले. त्यामुळे तेथील सेवांचा अंदाज येतो, असे सांगत पालेकरांनी पणजीतील ‘स्पा’च्या संख्येवरून येथील प्रशासनाच्या कारभारावर टीकेची संधी सोडली नाही. ∙∙∙

बोर्डा भागांतील अंदाधुंदी

बोर्डा हा मडगाव शहराचा एक महत्वाचा भाग व आता तर तेथील महत्व अधिकच वाढले आहे ते वेगळ्या कारणास्तव. परवा तेथील सरकारी मल्टिपर्पज शिक्षण संकुलात दहावीच्या वर्गात शिक्षण घेणा-या एका विद्यार्थ्याला बारावीत शिकणा-या विद्यार्थ्यांनी जी जबर मारहाण केली त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांचे पालक धास्तावले आहेत. पालक म्हणतात की संपूर्ण बोर्डा भागांत मुख्य रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात विविध स्वरुपाची व्यापारी आस्थापने वाढली आहेत व त्यामुळेच गैरप्रकारांत वाढ झाली आहे. या आस्थापनांसमोर वाटेल तशी वाहने उभी केली जातात व त्यांतूनही वरचेवर वाद होतात. पूर्वी बोलशे सर्कल ते होली स्पिरीट चर्च चौकपर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण व मध्ये दुभाजक असा प्रस्ताव होता पण राजकीय दडपणाने म्हणे तो बारगळला व त्यामुळे अंदाधुंदीत भरच पडली आहे.∙∙∙

नेहाही उतरणार रिंगणात?

मडगावचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम खात्‍याचे मंत्री दिगंबर कामत यांनी आपले पुत्र योगिराज कामत यांना आपला उत्तराधिकारी म्‍हणून पुढे आणण्‍याचा प्रयत्‍न मागच्‍या निवडणुकीपासूनच सुरू केला हाेता. आताही कुठल्‍याही कार्यक्रमात दिगंबर यांच्‍याबरोबर योगिराज हमखास दिसतात. याेगिराज यांना पुढे आणत असतानाच त्‍यांची पत्‍नी नेहा यांनाही दिगंबर कामत यावेळी मडगाव पालिकेच्‍या निवडणुकीत उतरविणार का? हा प्रश्‍न सध्‍या मडगावात चर्चेत आहे. याचे कारण म्‍हणजे, दिगंबर कामत यांची ज्‍या प्रभागावर जबरदस्‍त पकड आहे त्‍या मालभाट प्रभागात नेहा यांचा वावर या दिवसात बराच वाढला आहे. काही दिवसांपूर्वी याच भागात जे आरोग्‍य केंद्र सुरु केले होते. त्‍या शासकीय कार्यक्रमाला नेहा याही उपस्‍थित हाेत्‍या. त्‍यामुळे बाबा आता आपल्‍या सुनेलाही राजकीय दीक्षा देणार का? असे सगळेच विचारू लागले आहेत. त्‍यात भाजपच्‍या जुन्‍या सदस्‍यांचाही समावेश आहे बरं का? ∙∙∙

कोण कुणाला वाचवू पाहतेय?

गतवर्षी राज्‍यात गाजलेल्‍या ‘जॉब स्‍कॅम’ प्रकरणातील मुख्‍य आरोपी पूजा नाईक हिने सरकारी नोकऱ्या देण्‍यासाठी आपण मंत्री, आयएएस अधिकारी आणि पीडब्‍ल्‍यूडीच्‍या अभियंत्‍याला १७ कोटी रुपये दिल्‍याचा गौप्‍यस्‍फोट शनिवारी केला. शिवाय २४ तासांत त्‍यांनी पैसे परत न केल्‍यास त्‍यांची नावे उघडण्‍याचा इशाराही दिला. त्‍यामुळे पूजाने ज्‍यांना पैसे दिलेले होते, त्‍यांची नावे जाणून घेण्‍याची जनतेला प्रचंड इच्‍छा होती. त्‍यासाठी सर्वांचेच लक्ष सोमवारकडे होते. पण, त्‍याआधीच रविवारी क्राईम ब्रांचने तिची पुन्‍हा चौकशी सुरू केली. त्‍यामुळे सोमवारी तिच्‍याकडून नावे बाहेर न आल्‍याने सर्वांचाच भ्रमनिरास झाला. पण, या प्रकरणात कोण कुणाला वाचवू पाहतेय? असा प्रश्‍‍न मात्र अनेकांना पडला आहे.∙∙∙

दिखाऊ स्वच्छतेची धडपड..?

म्हापसा मासळी मार्केट संकुल परिसरातील अस्वच्छतेच्या कारणास्तव, नागरी आरोग्य विभागाने म्हापसा पालिकेला अंतिम नोटीस बजावली होती. यानंतर पालिका खडबडून जागी झाली व मागील काही दिवसांपासून पालिकेने सफाईचे काम हाती घेतले होते. त्यानुसार सोमवारी संयुक्त पाहणी झाली. स्वच्छतेविषयी दिलेल्या मुद्यांचे अनुपालन झाले आहे की नाही, यासाठी ही पाहणी होती. पालिकेने जवळपास ८०टक्के कामे पूर्ण करून, उर्वरित कामे प्रक्रियेत आहे, असा दावा केला. परंतु, अनुपालन अहवाल नेहमी शंभर टक्के पूर्ण असावा लागतो. थोडीच कामे प्रलंबित किंवा प्रक्रियेत आहेत, असे म्हणून चालत नसते. आजच्या पाहणीमुळे पालिकेने मार्केट संकुलात झाडलोट व मार्केट पाण्याने धुवून काढला होता. परंतु, ही स्वच्छता आजच्या पाहणीसाठी दिखाव्यापूरती होती की यापुढे टिकून राहते, हे येणाऱ्या दिवसांत स्पष्ट होईलच...∙∙∙

शिवोलीत मांद्रेकर प्रभाव दाखवतील?

माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांना अनुसुचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाचे अध्यक्षपद दिल्याने त्यांनी ताकद निश्चितपणे वाढली आहे. अलिकडे ते समाजाच्या माध्यमातून का होईना सक्रीय झाले होते. आता सरकारी पद मिळाल्याने ते जिल्हा पंचायत निवडणुकीत शिवोली आपल्या हाती राखण्यासाठी डाव टाकतील का हा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो या कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडून येऊन भाजपमध्ये आल्या आहेत. यामुळे जिल्हा पंचायत निवडणुकीत लोबो व मांद्रेकर यांच्यातील राजकीय वाद दिसून येईल का याची चर्चा आहे.∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात वंदे-मातरमची मुले उपाशी...

पोलिसांची ‘गस्तीची हवा’

गावात गस्त आणि गल्लीगल्लीत पोलिसांची हालचाल असे दृश्य अलीकडेच जास्त दिसू लागले आहे. रात्री उशिरा होणाऱ्या धाडी, चौकाचौकात उभे असलेले पोलिस आणि अचानक घेतली जाणारी तपासणी यामुळे गुन्हेगारांत धडकी भरली आहे. ‘आता तरी पोलिस जागे झाले!’ असं लोकही म्हणू लागलेत. पण हा उत्साह किती दिवस टिकणार? गुन्हे वाढले की धाडी सुरू, आणि शांतता परतली की पुन्हा जैसे थे! लोकांच्या मनातला हा संशय मात्र कमी झालेला नाही. रात्रभर फिरणारे पोलिस, अचानक होणारी चौकशी, यामुळे थोडं तरी सुरक्षित वाटतंय. पण लोकांची अपेक्षा स्पष्ट आहे आणि ती म्हणजे ‘ही गस्त फक्त मोसमापुरती नको, रोजची सवय व्हावी!’ आता पाहायचं एवढंच की, ही पोलिसांची ‘गस्तीची हवा’ किती दिवस टिकते!∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: 'ये अज्ञानी', गोव्याला 'कायदाहीन' म्हणणाऱ्या केजरीवालांना भाजपने दिला दम; Post Viral

आरोलकर यांच्याकडून पडदा

आपल्या पत्नीने भाजपच्या उमेदवारीवर जिल्हा पंचायत निवडणूक लढवायची की नाही, याविषयी काहीही ठरवलेले नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल, असे म्हणत मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी या विषयातील गुढ आणखी वाढवले आहे. आरोलकर हे मगोचे आमदार असताना त्यांच्या पत्नी सिद्धी या भाजपच्या उमेदवारी जिल्हा पंचायत निवडणूक लढतील, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे आरोलकर यांचा भाजपच्या दिशेने प्रवास सुरू झाल्याचा राजकीय अर्थही काढण्यात आला होता. आता त्या भाजपच्या उमेदवारीवर लढणार नाहीत, असे सरळपणे आरोलकर यांनी सांगितलेले नाही. तसा निर्णय घेतलेला नाही, असे सांगत त्यांनी निर्णयास वाव असल्याचे सुचित केल्याने राजकीय वर्तुळात त्याची दखल घेतली गेली आहे.∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com