पणजी: जुने गोवे (Old goa) वारसास्थळांचे संरक्षण व्हावे यासाठी गेल्या दोन दिवसांपासून उपोषणाला बसलेले अॅड. अमित पालेकर (Amit Palekar) यांची पत्नी आणि लहान मुलीने भेट घेतली. यावेळी ते भावुक झाले. तसेच शेवटपर्यंत आपण लढा देणार असल्याचे स्पष्ट केले.
जुने गोवा येथील कॅजिटन चर्चजवळ सुरू असलेल्या बेकायदा बांधकामाच्या मालकाला जुने गोवा पंचायतीने काम थांबवण्याची नोटीस बजावली आहे. पालेकर यांनी पंचायतीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र जोपर्यंत नगरनियोजन खाते या बांधकामांना दिलेली परवानगी रद्द करत नाही, तोपर्यंत आपण बेमुदत उपोषण सुरू ठेवणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अनेक लोकप्रतिनिधींनी आंदोलकांना पाठिंबा देऊनही सरकारने बेकायदा बांधकामांवर कारवाई केलेली नाही. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाल्यानंतर पंचायतीने काम थांबवण्याचे आदेश जारी केले. मात्र सरकार या प्रकरणी कारवाई करण्यास का टाळाटाळ करत आहे, असा सवाल पालेकर यांनी उपस्थित केला. नगरनियोजन खात्याने एकदा काम रद्द करण्याची नोटीस जारी केली की किमान लोकांचा सरकारवर विश्वास तर बसणार आहे. त्यानंतर आम्ही या प्रकरणाचा कायदेशीर पाठपुरावा करू, असे ते म्हणाले. या बेकायदा बांधकामाला परवानगी देण्यात संबंधित सर्व अधिकारी गुंतले होते, असा आरोपही त्यांनी केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.