

पणजी: न्यायालयाच्या निवाड्यानंतर फोंडा पोटनिवडणूक रद्द झाली. त्यामुळे राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावर सर्व स्तरांतून टीका होऊ लागली आहे. दुसरीकडे महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या गोपनीयतेवर आक्षेप घेत ‘आमी पणजेकार’ पॅनलच्या उमेदवारांसह इतरांनी उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.
उत्पल पर्रीकर यांनी आज पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी माजी नगरसेवक मिनीन डिक्रुझ, ॲड. विष्णू नाईक आणि इतर उपस्थित होते. याचिकादारांनी पणजी महापालिका निवडणुकीची अधिसूचना रद्द करण्याची मागणी जिल्हा व सत्र न्यायालयात केली असून यावरील सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे.
ॲड. नाईक म्हणाले, महापालिका निवडणुकीत मतदारांच्या गोपनीयतेचे उल्लंघन झाल्यानेच आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागली आहे. त्यामुळेच उत्तर जिल्हा न्यायालयात आम्ही आव्हान दिले आहे. त्यात माझ्यासह दिओदिता परेरा, वैभव साळगावकर आणि प्रशिला कुंकळ्ळीकर यांनी याचिका दाखल केली आहे.
यात महापालिका आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी (आरओ) आणि नवनिर्वाचित ३० नगरसेवकांना प्रतिवादी केले आहे. न्यायालयाने याप्रकरणी सर्वांना नोटीस बजावली असून, उद्या (शुक्रवारी) त्यावर सुनावणी होणार आहे.
मतदार यादीवरील क्रमांक बॅलेट पेपरवरही
महापालिकेची गत निवडणूक ‘ईव्हीएम’वर घेण्यात आली होती. परंतु याचवेळी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित होतो. बॅलेट पेपरवर घेतलेल्या मतदानात गोपनीयता राहिलेली नाही. कारण मतदार यादीवरील क्रमांक हाच बॅलेट पेपरवर असल्याने मतदानाची गोपनीयता कशी राखली जाईल, हा मुख्य आक्षेप ‘आमी पणजेकार’ गटाच्या सदस्यांनी उपस्थित केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.