Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत होणार दुर्गंधीमुक्त! पोलाद कारखाना, वृक्ष लागवडीसाठी होणार सांडपाण्‍याचा पुनर्वापर

Cuncolim IDC Pollution: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत प्रदूषण आणि दुर्गंधीसाठी कुप्रसिद्ध आहे, तिच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पोलाद कारखाना व वृक्ष लागवडीसाठी वापरण्याची महत्त्वाकांक्षी योजना सुरू झाली आहे.
Cuncolim Industrial Estate , Goa
Cuncolim IDC Sewage treatment tanksDainik Gomantak
Published on
Updated on

Cuncolim Industrial Estate Pollution and Stench Issue

कुंकळ्ळी: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत प्रदूषण आणि दुर्गंधीसाठी कुप्रसिद्ध आहे, तिच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पोलाद कारखाना व वृक्ष लागवडीसाठी वापरण्याची महत्त्वाकांक्षी योजना सुरू झाली आहे.

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत प्रदूषणासाठी विशेषतः पोलाद उद्योग व मत्स्य प्रक्रिया कारखानदारीसाठी बदनाम आहे. परंतु, आता गोवा सरकारने काही कठोर निकष लागू केले असून, त्यामुळे लोकांच्या तक्रारी कमी होऊ शकतात. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दुर्गंधीबाबत तर प्रदूषण नियंत्रण मंडळाला कालमर्यादा आखून दिली आहे.

‘तेथे प्रदूषण व दुर्गंधीचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून आहे; पण त्या प्रश्‍नाचा अभ्यास करून निश्‍चित कालमर्यादेत त्यावर उपाय शोधण्याच्या सूचना मी दिल्या होत्या. त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही पावले उचलली. आता लवकरच दीर्घकालीन उपाय निघेल, याचा मला विश्‍वास आहे’, असे मत मुख्यमंत्री सावंत यांनी ‘गोमन्तक’शी संवाद साधताना व्यक्त केले.

‘गोमन्तक टीम’ने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसह कुंकळ्ळीतील प्रदूषणकारी उद्योगांना भेटी दिल्या. त्यात मत्स्य कारखाने व मद्य निर्मिती प्रकल्पांचा समावेश होता. ‘सीमॅक’ हा संपूर्ण निर्यात मत्स्य प्रक्रिया प्रकल्प असून तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी ‘एफ्ल्यूएंट ट्रीटमेंट प्लांट’ (ईटीपी) तेथे कार्यान्वित झाली आहे. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत मत्स्य पशू खाद्य व मत्स्य प्रक्रिया असे प्रत्येकी एक व ६ प्रकल्प असून हे सर्व ७०० कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्यात करतात. परंतु त्यातील बहुतेकांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प संपूर्णतः कार्यान्वित केले नव्हते.

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील दुर्गंधीने कहर केला असूनही सरकार आवश्‍‍यक हालचाली करीत नसल्‍याच्‍या तक्रारी वाढल्‍या व मत्‍स्‍य प्रकल्‍पांना ते काही दिवस बंद ठेवून पुन्‍हा सुरू करण्‍यास मान्‍यता दिल्‍यानंतर लोकांचा संशय वाढीला लागला होता. परंतु त्‍यानंतर मुख्‍यमंत्र्यांनी हस्‍तक्षेप केला व प्रदूषण नियंत्रण मंडळाने गांभीर्याने उपायांची कास धरली आहे. आता प्रत्‍यक्षात उपाययोजनेला सुरुवात झाली आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांच्या मते, या ‘ईटीपी’ यंत्रणेवर एकूण गुंतवणुकीच्या ५ टक्केही खर्च येत नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या महिन्यात मत्स्य मिल व दोन मत्स्य प्रक्रिया प्रकल्प बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर देखरेखीखाली ते सुरू करण्यात आले आहेत.

हे सात मत्स्य कारखाने अंदाजे पाच लाख लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते स्वच्छ पाणी वृक्ष लागवड व पोलाद कारखान्यांच्या वापरासाठी पुरवठा करणार आहेत. ‘वृक्ष लागवड व बागांसाठी यापूर्वीच हे पाणी टॅंकरद्वारे वापरले जाऊ लागले आहे. शिवाय पोलाद कारखान्यांना लागणारे पाणी जलवाहिनी व नळ टाकून त्यांना ते थेट उपलब्ध करून देण्यासाठी हालचाली सुरू आहेत’, अशी माहिती महेश पाटील यांनी दिली. वृक्ष लागवडीसाठी हे पाणी वापरण्याच्या सूचना मी दिल्या आहेत व दोन महिन्यांत ‘आयडीसी’मार्फत हे पाणी पोलाद कारखान्यापर्यंत थेट नेण्यासाठी जलवाहिनी बसवण्याचे काम सुरू होईल, असे पाटील म्हणाले.

पोलाद कारखान्यासाठी साडेसात लाख लिटर पाणी वापरले जाते. त्यासाठी प्रतिदिनी ५० टॅंकर वसाहतीत ये-जा करतात. प्रति टॅंकरचा दर दीड हजार रुपये असून मत्स्य कारखान्यांकडून आयते पाच लाख लिटर पाणी उपलब्ध झाल्यास केवळ दीड लाख लिटर पाणी बाहेरून आणण्याची गरज लागेल. मत्स्य कारखान्यांमधून येणारे हे पाणी टॅंकरपेक्षा पन्नास टक्के स्वस्त असेल. हा निधी मत्स्य कारखाने आपले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प चालू ठेवण्यासाठी वापरू शकतील.

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष अभय केणी यांच्या मते, वसाहतीत मोकळ्या जागा हेरून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली आहे. तेथे स्प्रिंकलर बसवून प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे सुरू केले आहे. औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक परिमल यांच्या सहकार्याबद्दल आभार मानताना ज्या तीव्रतेने त्यांनी मोकळ्या जागा उपलब्ध करून दिल्या तेथे २ हजारांवर रोपांची लागवड आम्ही केली आहे. आता तीन महिन्यांत ही झाडे बऱ्यापैकी वाढली आहेत. प्रदूषण कमी करण्यासाठी आमच्या कारखानदार संघटनेचे हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे, अशी माहिती केणी यांनी दिली.

मत्स्य मिल प्रक्रिया (मासळीपासून पशुखाद्य निर्मिती) कारखान्याचे प्रमुख सेबी सिल्वा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांडपाणी प्रक्रियेसाठी ‘एरोबिक’ ही पद्धती अवलंबली. तीन मोठ्या टाक्यांमध्ये आम्ही दुर्गंधीयुक्त सांडपाणी साठवतो. त्यामध्ये विविध रसायने व मायक्रोब्ज (सूक्ष्म जंतू) मिसळले जातात. ही प्रक्रिया दोन पातळीवर होते व त्यातून शुद्ध पाणी मिळते. हे स्वच्छ पाणी फिश मिल व मत्स्यप्रक्रिया कारखाना अशा दोन ठिकाणी आम्ही पाहिले जे दुर्गंधी मुक्त होते.

हे पाणी अजूनही पिण्यासाठी लायक नाही; परंतु ते कारखानदारी व वृक्षलागवडीसाठी मात्र उपयुक्त आहे. ‘या पाण्यात मत्स्य बीज असल्याने वृक्ष लागवडीसाठी तर ते खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे फवारणीसाठी आम्ही कारखान्यातही त्याचा उपयोग सुरू केला आहे’, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कुंकळ्ळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष यतीन तळावलीकर यांच्यामते, एक महिन्यापूर्वीही मत्स्यनिर्मिती प्रकल्प शेतात पाणी सोडत असत, ते रासायनिक पाणी आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आहे. आता जर ही सांडपाणी प्रक्रिया काटेकोर बनली व तिच्यावर कडक निगराणी ठेवण्यात आली तर आम्हाला आनंदच होईल.

दुर्गंधीचा प्रश्‍न सुटणार

१. कुंकळ्ळीत काही ठिकाणी अजूनही मासळीची दुर्गंधी पसरते, यात तथ्य आहे. परंतु ही दुर्गंधी औद्योगिक वसाहतीतून येत नाही. या मत्स्य मिलसाठी जी मासळी राज्याबाहेरून येते, त्यामुळे दुर्गंधी जाणवू शकते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने ती मासळी आयातही आता बंद कंटेनरमधून आणण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांनी दिली.

२.कुंकळ्ळीतील एक कार्यकर्ते विजय कोप्रे म्हणाले, त्यांचे घर औद्योगिक वसाहतीपासून अवघ्या एक किलोमीटरवर आहे. त्यांना अजून दुर्गंधीचा त्रास कमी झालेला नाही. पाटील यांच्या मते, ही दुर्गंधी केवळ मत्स्य वाहतुकीद्वारेच येऊ शकते, तिच्यावर आता निर्बंध लागू केले आहेत.

Cuncolim Industrial Estate , Goa
Goa Crime: धक्कादायक! वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून मुलाने संपवले जीवन; उसगावात खळबळ

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत मत्‍स्‍य उद्योगांनी सांडपाणी प्रक्रिया सुरू केली आहे; पण ती सुरू ठेवण्‍यासाठी त्‍यांची इच्‍छाशक्‍ती कायम राहील का, असा नागरिकांचा सवाल आहे.

मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रदूषण नियंत्रण मंडळाला कडक कारवाईचे आदेश

‘आयडीसी’च्‍या कृतिशील भूमिकेचे स्‍वागत; वृक्ष लागवडीस चालना

सांडपाण्‍यावर प्रक्रिया केलेले पाणी दोन महिन्‍यांत नळाद्वारे कारखान्‍यांना देणार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com