पणजी: भयभीत झालेल्या आमदार चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) यांनी बाणावलीमध्ये ‘आप’ची रोजगार (AAP) यात्रा रोखण्यासाठी पोलिस दलाचा (Goa Police) गैरवापर केल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे प्रभारी आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य कॅप्टन वेंझी व्हिएगस यांनी केला. अशा प्रकारांना न घाबरता आम आदमी पक्ष गोव्यातील युवकांच्या हक्कासाठी लढत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
चर्चिल आलेमाव यांना बाणावलीमध्ये आम आदमी पक्षाचा होत असलेला विस्तार लक्षात आला आहे. यापूर्वी त्याचा मुलगा आणि पुतण्याने ‘आप’च्या स्वयंसेवकांवर आणि जि.पं. सदस्य हँझेल फर्नांडिसवर हल्ला केला होता, जे शिक्षणावरील चर्चेसाठी बॅनर लावत होते. आलेमाव यांच्या बालेकिल्ल्यात ‘आप’ आक्रमकपणे काम करत आहे. बाणावलीमध्ये हॅन्झेल फर्नांडिस हा ‘आप’चा पहिला जि.पं. सदस्य ठरला आहे याचा आलेमाव यांनी धसका घेतला असल्याचे कॅप्टन व्हिएगस म्हणाले.
आम आदमी पक्षाची रोजगार यात्रा 8 ऑक्टोबर रोजी सुरू झाली आणि राज्यात विविध ठिकाणी ती सुरळीत पार पडली, मात्र बाणावलीमध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे यात्रेत विघ्न आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या यात्रेने आतापर्यंत 14 मतदारसंघांचा दौरा केला आहे आणि अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या नोकरीच्या हमीची माहिती ‘आप’चे स्वयंसेवक प्रत्येक गोमंतकीयाच्या घरी जाऊन देत आहेत. ‘आप’ राज्यभरातील 75 बूथवर नागरिकांची नोंदणी करत आहे.
‘आप’ची बाणावली टीम स्थानिकांच्या मदतीसाठी कॅप्टन वेंझी व्हिएगस यांच्या नेतृत्वाखाली आक्रमकपणे काम करत आहे. कॅप्टन व्हिएगस रहिवाशांच्या मदतीसाठी खंबीरपणे उभे राहिले, रहिवाशांना रेशन पुरवण्यासाठी घरोघरी गेले. त्यांनी बाणावलीमधील शाळा आणि अंगणवाड्यांच्या दयनीय परिस्थितीवरही प्रकाश टाकला आहे.
भाजपची कोणतीही ‘बी टीम’ आम्हांला गोव्यातील तरुणांच्या बेरोजगारीचे प्रश्न मांडण्यापासून रोखू शकत नाही, असे कॅप्टन व्हिएगस म्हणाले. आमदार चर्चिल आलेमाव यांना मला सांगायचे आहे, की आम्ही घाबरणार नाही आणि आम्ही थांबणार नाही, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.