

काणकोण: काणकोणमधील सर्व गावे भूमीगत वीज वाहिन्यांनी जोडण्यात येईल, अशी घोषणा उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी गोवा मुक्तीच्या काणकोणमधील प्रमुख कार्यक्रमात ध्वजारोहण केल्यानंतर बोलताना केली. काणकोण मामलेदार कार्यालयासमोर हा कार्यक्रम झाला. यावेळी काणकोणचे उपजिल्हाधिकारी सतीश प्रभू, मामलेदार विमोद दलाल, पोलिस निरीक्षक प्रवीण गावस व अन्य खात्याचे प्रमुख उपस्थित होते.
इजिदोर फर्नांडिस म्हणाले, काणकोणातील खंडित वीज पुरवठ्याची समस्या कायमची निकालात काढण्यासाठी पालिका क्षेत्र, पैंगीण, लोलये, आगोंद त्याचप्रमाणे उर्वरीत गावडोंगरी व खोतीगाव पंचायत क्षेत्र भूमीगत वीज वाहिन्यांनी जोडले जाईल. त्याचप्रमाणे पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मोठ्या व्यासाची जलवाहिनी घालण्यात येऊन दोन जलकुंभ उभारण्यात आले आहेत. रविंद्र भवन उभारणीचे काम जलद गतीने सुरू आहे. कोरोना महामारीमुळे काही कामे निर्धारित वेळेत कामगार गावी गेल्यामुळे पूर्ण होऊ शकली नाहीत, याची जाणीव सरकारला आहे. मात्र आता विकासकामांनी गती घेतली आहे. कोरोना महामारी, खाण व्यवसाय ठप्प आहे, पर्यटन व्यवसात आलेली मंदी व लॉकडाऊन यामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली, असे असताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या सर्वाची झळ राज्याच्या विकासाला लागू दिली नाही.
त्यामुळेच लहान राज्यातून गोव्याला पुरस्कार प्राप्त झाले. सरकार ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कोरोना महामारी काळात काणकोणमधील जनतेने संयम पाळला. त्याचप्रमाणे पोलिस, आरोग्य खात्याचे कर्मचारी, मामलेदार, उपजिल्हाधिकारी, अग्निशामक केंद्र या पहिल्या फळीतील योद्ध्यांनी चांगली कामगिरी केली. त्याचबरोबर श्रीस्थळ जैवविविधता व्यवस्थापन समितीसारख्या बिगर सरकारी संघटना व व्यक्तींनी लॉकडाऊन काळात जनतेची सेवा केली. त्या सर्वाना माझा सलाम, असे म्हणून त्यांच्याबदल उपसभापतींनी कृतज्ञता व्यक्त केली. सुरूवातीला पोलिसांनी त्याना मानवंदना दिली. त्यानंतर उपसभापतींनी ध्वजारोहण केले. यावेळी मामलेदार कार्यालयाने घेतलेल्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण करण्यात आले. सूत्रनिवेदन शिरिष पै यांनी केले. अंगणवाडी सेविकांनी गायलेल्या वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
आणखी वाचा:
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.