पणजी: देशभरातील युवा बॅडमिंटनपटूंचे कौशल्य गोव्यात बहरताना दिसणार आहे. जुलै महिन्यात नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये अखिल भारतीय मानांकन ज्युनियर आणि सबज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा होतील. (All India Qualifying Junior and Sub-Junior Badminton Tournament to be held at Manohar Parrikar Indoor Stadium )
ज्युनियर (19 वर्षांखालील ) स्पर्धा 15 ते 21 जुलै या कालावधीत, तर सबज्युनियर (15 व 17 वर्षांखालील ) स्पर्धा 23 ते 30 जुलै या कालावधीत खेळली जाईल. या दोन्ही मानांकन स्पर्धेतील कामगिरी खेळाडूंच्या ‘टॉप्स’ योजनेसाठी, तसेच राष्ट्रीय शिबिर आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी संघ निवड चाचणीसाठी गृहीत धरली जाईल. त्यामुळे गोव्यातील स्पर्धेचे महत्त्व वाढले आहे, अशी माहिती गोवा बॅडमिंटन संघटनेचे सचिव संदीप हेबळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेस गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक अजय गावडे, गोवा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष नरहर ठाकूर, उत्तर गोवा जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष मनोज पाटील, सचिव पराग चौहान, सल्लागार नीलेश नायक यांची उपस्थिती होती.
ज्युनियर गटात एकूण चार लाख रुपये, तर सबज्युनियर गटात एकूण सहा लाख रुपयांची बक्षिसे
राज्यातील सुविधांचा वापर व्हावा
यावेळी क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक अजय गावडे यांनी राज्यातील विविध ठिकाणी उपलब्ध क्रीडा सुविधांचा योग्य वापर होत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. गोवा बॅडमिंटन संघटना राज्यात लागोपाठ दोन प्रमुख स्पर्धा घेत आहे ही संतोषजनक बाब असल्याचे नमूद करून लवकरच बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि जलतरण या खेळांसाठी खेलो इंडिया योजनेअंतर्गत क्रीडा नैपुण्य केंद्र सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सुमारे अडीच हजार खेळाडू
नावेलीत होणाऱ्या दोन्ही स्पर्धांत मिळून दोन ते अडीच हजार खेळाडू सहभागी होतील. भारतीय बॅडमिंटन संघटनेने ज्युनियर स्पर्धेसाठी केरळचे जे. मेल्विन मिनॉय यांची, तर सबज्युनियर स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे विवेक सराफ यांची मुख्य रेफरीपदी नियुक्ती केली आहे. या दोन्ही स्पर्धा गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने घेण्यात येत असून एकूण अंदाजपत्रक 60 लाख रुपये आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.