मडगाव: स्वतःला काँग्रेसनिष्ठ म्हणवून घेणाऱ्या आणि काँग्रेस कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही असा राहुल गांधी यांना शब्द दिलेले कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स (Aleixo Reginaldo) यांनी आज आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसला जबरदस्त धक्का दिला. यामुळे गोव्यात काँग्रेस आमदारांची संख्या केवळ दोनवर पोहोचली असून मागच्या 50 वर्षात गोव्यात काँग्रेसची एव्हढी हलाखीची स्थिती पहिल्यांदाच झाली आहे.
रेजिनाल्ड हे आता तृणमुल काँग्रेस (Trinamool Congress) पक्षात सामील होणार असून उद्या ते या पक्षात प्रवेश करतील असे सांगण्यात येत आहे. राजीनामा दिल्यावर आज सायंकाळी कोलकता गाठला. तिथे ते तृणमुलचे नेते अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांची भेट घेणार असे सांगितले जाते. आज तृणमूलच्या खासदारांनी कोलकता विमानतळावर त्यांचे स्वागत केले. रेजिनाल्ड हे काँग्रेसने पाहिले जे आठ उमेदवार जाहीर केले त्यातील एक असून शेवटच्या क्षणी त्यांनी काँग्रेसचा घात केल्याची भावना आता काँग्रेस नेत्यात बळावली आहे.
लुईझींन फालेरो आणि रवी नाईक यांनी पक्षत्याग करून दिलेल्या धक्क्यातून आताच कुठे सावरू लागलेल्या काँग्रेस पक्षासाठी जिव्हारी बसलेला हा घाव ठरला आहे. रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी आज सकाळी आपल्या आमदारकीचा राजीनामा सभापती कार्यालयात सादर केला. रेजिनाल्ड यांनी आपले दोन्ही फोन स्विच ऑफ केल्याने त्यांच्याकडे संपर्क साधणे शक्य झाले नसून त्यांचे कुडतरी येथील निवासस्थानीही पूर्णतः शुकशुकाट होता.
यापूर्वी रेजिनाल्ड यांनी आपल्या वाढदिनीच काँग्रेस पक्ष सोडून आम आदमी पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर खुद्द राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्यांना फोन करून समजूत घातल्यानंतर त्यांनी आपले बंड आवरते घेतले होते. त्यानंतर त्यांना प्रदेश काँग्रेस समितीवर कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. मागचे तीन महिने सगळे काही ठीकठाक चालू आहे असे वाटत असतानाच रेजिनाल्ड यांनी हा तडकाफडकी निर्णय घेतला.
रेजिनाल्ड यांनी हा निर्णय घेण्यामागे बरीच मोठी पैशांची ऑफर
काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी व्यक्त करताना आलेक्स रेजिनाल्ड यांची संभावना सर्वात मोठा विश्वासघातकी असा केली. आता कुडतरीचे मतदारच त्यांना धडा शिकवतील असे सांगत रेजिनाल्ड यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसवर कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही. आमच्याकडे तिथे दुसरा पर्याय उपलब्ध आहे असे ते म्हणाले.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी महापुरे झाडे जाती तिथे लव्हाळी वाचती असे ट्विट करत या पूर्वी काँग्रेस अशा कित्येक वादळातून सही सलामत बाहेर आली असून आताही तसेच होईल असे म्हटले आहे. तर प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी रेजिनाल्ड सुरवातीपासून अस्थिर होते. ते कधीही स्थिरपणे काँग्रेस बरोबर नव्हतेच. उलट काँग्रेस त्यांना सांभाळून घेत होती अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.