Dudhsagar Waterfall: कुळे दूधसागर पर्यटनस्थळावर ऑनलाईन बुकींगसाठी एजंटचा सुळसुळाट असल्याची माहिती समोर आली आहे. हे एजंट भरमसाठ पैशाने जीपगाडी पर्यटकांना देत असल्याने पर्यटकांत नाराजी पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटकांच्या सोयीसाठी सरकारच्या माध्यमातून ऑनलाईन बुकिंग सुरु करण्यात आले आहे. बुकींगसाठी एका पर्यटकांमागे 25 रुपये ऑनलाईन आकारले जातात. बुकींगसाठी आणखी काहीही ठोस पुरावा घेत नसल्याने यामध्ये एजंटचे आयतेच फावत आहे.
ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन हे एजंट प्रत्येक पर्यटकमागे 25 रुपये प्रमाणे गाड्या बुकींग करतात. अशा एजंटमागे टॅक्सी व बस ड्रायव्हर गुंतलेले असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक काही युवक सुद्धा यामध्ये गुंतलेले आहेत.
कुळे गावात बसून हे एजंट जीपगाड्या ऑनलाईन बुक करतात आणि भरमसाठ दराने ते पर्यटकांना देतात. त्यामुळे एका स्थानिक एजंटला एकाच ठिकाणी बसून अवघ्या तासात 5 ते 10 हजार मिळतात. याची पूर्ण माहिती समितीला असल्याने त्यांनी या संदर्भात पोलिस स्थानकात तोंडी तक्रारही दिली असल्याचे सुत्रांनी सांगितले.
अशाच प्रकारे पर्यटकांना लुटत राहिल्यास दुधसागर पर्यटनस्थळला आणि पर्यायाने गोवा पर्यटन विभागाला गालबोट लागण्यास वेळ लागणार नाही, असे मत येथील जाणकारांनी व्यक्त केले.
ऑनलाईन फसवणूक प्रकरणात गुंतलेल्या एका ड्रायव्हरला शुक्रवारी पकडले होते. त्याला योग्य समजही दिली होती. मात्र त्याने या संदर्भात एक व्हिडिओ बनवला, ज्यामध्ये तो पर्यटकांना दूधसागर धबधब्यावर न येण्याचा सल्ला देताना दिसत आहे. जर हा व्हिडिओ व्हायरल झाला तर इथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये घट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संबंधितानी योग्यवेळी उपाययोजना केली तरच सर्व काही ठिक होईल, असे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.
तसेच ऑनलाईन गैरप्रकार टाळण्यासाठी पुरावा म्हणून ओळख प्रमाणपत्र घ्यावे, जेणेकरून एजंट फसवणूक करू शकणार नाहीत, असे सांगण्यात येत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.