
पणजी: गेल्या सतरा वर्षापासून गोव्यात होणाऱ्या ईडीएम सनबर्न संगीत महोत्सव आता मुंबईत होणार आहे. सनबर्नच्या या सीझनसाठीच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. सनबर्न गोव्यातून बाहेर गेल्याने याचा पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गोवा सरकारचा पर्यटन विभाग यावर तोडगा काढण्यासाठी पुढे सरसावला असून, भव्य संगीत महोत्सव आयोजित करण्याचा विचार करत आहे.
डिसेंबरमध्ये तीन दिवस होणाऱ्या सनबर्न संगीत महोत्सवासाठी देश - विदेशातील लाखो पर्यटक गोव्यात दाखल होत असतात. सनबर्नला एक विरोध करणारा तर, दुसरा समर्थन करणारा गट गोव्यात पाहायला मिळतो. यावरुन दरवर्षी राज्यात वाद पाहायला मिळतो.
पण, महोत्सवामुळे मोठ्या संख्येने पर्यटक राज्यात येतात व स्थानिकांना रोजगार मिळतो असेही मत व्यक्त केले जाते. दरम्यान, सनबर्न आता राज्यातून बाहेर गेल्याने पर्यटनाला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यासाठी गोवा सरकारच्या पर्यटन विभागाने मोठा प्लॅन केला असून, संगीत महोत्सव आयोजित करण्याचा विचार करत आहे. यासाठी पर्यटन विभागाने एक पाऊल पुढे टाकले असून, यासाठी इव्हेंट कंपन्यांकडून प्रस्ताव मागितले आहेत.
महोत्सवाचे नियोजन करणे, त्याची थीम तयार करणे आणि महोत्सव व्यवस्थित पार पाडणे अशी सर्व जबाबदारी संबंधित कंपनीवर राहणार आहे. सरकार महोत्सवासाठी कोणताही आर्थिक खर्च उचलणार नाही त्यामुळे कंपनीलाच सर्व खर्च उचलावा लागणार आहे, असे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सरकार खर्च उचलणार नसल्याने इव्हेंट कंपनीला तिकीटाचे दर निश्चित करण्याचे स्वातंत्र्य राहणार आहे. दरम्यान, इच्छुकांना यासाठी ०८ ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव पाठवता येणार आहे.
दरम्यान, नियोजित संगीत महोत्सव कधी पार पडणार तो किती दिवसांचा असणार तसेच तो कोणत्या ठिकाणी पार पडणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण, सरकार सनबर्नच्या बदल्यात त्या समकक्ष महोत्सव राज्यात पार पाडण्याचा विचार करत असल्याचे दिसून येते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.