पणजी: गणेश चतुर्थीनंतर (Ganesh Chaturthi) जेवणाच्या थाळीचे (dinner plate rate) दर वाढतात ही राज्यातील परंपराच (Tradition) बनली आहे. ‘नुस्त्या’चे वाढणारे दर हे त्यामागील कारण असल्याचे हॉटेलमालक (Hotels) सांगतात. यंदा अजून तरी थाळीचे दर वाढले नसले तरी काही दिवसांत ते वाढण्याची शक्यता आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
पणजी शहरातील हॉटेलांमध्ये सध्या 120 ते 150 रुपयांना जेवणाची थाळी मिळते. काही हॉटेलांमध्ये त्याहूनही कमी किमतीत जेवण मिळते. चतुर्थीनंतर जेवणाच्या थाळीचे दर वाढविण्याचा हॉटेलमालकांचा शिरस्ता आहे. त्यात यंदाही बदल होणार नाही. दरम्यान, यंदा तर दरात आधीच वाढ करायल हवी होती, पण आधीच ग्राहक कोविड महामारीने त्रस्त असल्याने व्यापारावर परिणाम होऊ नये, यासाठी ती केली नसल्याचे कामत हॉटेलच्या संचालकांकडून सांगण्यात आले.
गोव्यात पर्यटक येतात तेच मुळात येथील ‘हुमण आणि शिता’वर ताव मारण्यासाठी. त्याशिवाय स्थानिकदेखील घरचे जेवण टाळून अनेकदा हॉटेलच्या जेवणाची चव चाखत असतात. एरवी, राज्यात जेवणाचे दर वाढत नाहीत. परंतु गणेश चतुर्थीनंतर हमखास दरवाढ होते असा होरा आहे. काही हॉटेलमालकांकडे याबाबत विचारणा केली असता, अजून दरवाढ झालेली नाही पण लवकरच ती होईल, असे सांगण्यात आले.
घरगुती खाणावळीचे दर 20 रुपयांनी वाढले
घरगुती खानावळीतील जेवण स्वस्त म्हणजे अगदी 80 ते 100 रूपयांना मिळायचे. आता मासळीचे जेवण मिळणाऱ्या खानावळीत हे दर 20 रूपयांनी वाढले आहेत तर शाकाहारी जेवणाचे दरही पाच ते दहा रूपयांनी वधारले आहेत.
दर कुणासाठी वाढवायचा? आधीच सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे. दरवर्षी दर वाढविले जात होते, पण सध्या म्हणावे तसे पर्यटकच येत नाहीत. त्यामुळे म्हणावा तसा व्यापार होत नसला तरी इतर गोष्टींचा विचार करावाच लागेल. हॉटेलमध्ये फ्रीज वगैरे सामग्री असते. ती खराब होऊ नये यासाठी व्यवसाय सुरू ठेवावा लागतो. पण कामगारांचे पगार आणि महागाईमुळे परवडत नाही.
- गौरीश धोंड, अध्यक्ष हॉटेलमालक संघटना
सध्या शाकाहारी जेवणाचे दर 120 ते 150 पर्यंत आहे. सध्या तरी कोणत्याच हॉटेलने दर वाढविलेले नाहीत. परंतु ते आगामी काळात वाढू शकतात. कारण महामाईने कळस गाठला आहे.
- योगराज शानभाग, हॉटेलमालक
चतुर्थीनंतर राज्यात मासळीचे दर भडकतात. सध्या किरकोळ बाजारात बांगडा 300 रूपये किलो मिळत आहे. तरीसुद्धा अजून जेवणाचे दर वाढलेले नाहीत.
- भास्कर शेट्टी, व्यवस्थापक रिट्झ हॉटेल
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.