कारवार पोलिसांकडून मद्यपींविरुद्ध कारवाई सुरु केल्याने सीमा भागातील मद्यालयाची उलाढाल घटली

पोळे तपासणी नाका.
पोळे तपासणी नाका.

काणकोण - कारवार पोलिसांनी मद्यपींविरूद्ध आल्कोमीटरची आघाडी उघडल्याने सीमा भागातील मद्यालयांची उलाढाल घटली आहे. कारवार पोलिसांनी पोळे सीमा रेषेवर माजाळी चेक नाक्यावर व कोडीबाग पुलावर गेल्या आठवड्यापासून दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना अडवून आल्कोमीटर लावून दुपारी व संध्याकाळी तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.

गोव्यातील पोळे, लोलये व माशे येथील मद्यालयाचे सुमारे साठ टक्के ग्राहक माजाळी, सदाशिवगड व कारवार येथील असतात. शनिवार, रविवार व सुटीच्या दिवसात ही संख्या वाढत असते. एका माहितीप्रमाणे, पोळे तपासणी नाका ते माशेपर्यंत वीसपेक्षा जास्त मद्यालये आहेत. ही सर्वच मद्यालये काही प्रमाणात  कारवार तालुक्यातील ग्राहकांवर अवलंबून आहेत.

मात्र हल्लीच्या काळात कारवार पोलिसांनी घेतलेल्या कठोर धोरणामुळे त्याच्या दिवसाकाठी उलाढालीत घसरण झाली आहे. मागील महिन्यात माजाळी तपासणी नाक्यावर कारवार पोलिसांनी दोन विविध प्रकरणांत गोव्यातून कारवार जिल्ह्यात होणारी बेकायदा दारू वाहतूक प्रकरणे पकडली होती. गोव्यातून आडमार्गाने कारवार जिल्ह्यात अवैध मार्गाने कर्नाटकात दारू वाहतूक होत आहे. पूर्वी समुद्रमार्गे होत होती ते लपून राहिले नाही.

कर्नाटकात मद्याच्या किमती गोव्यापेक्षा दुप्पट आहेत. त्यामुळे येथील नागरिक पेट्रोल व मद्यासाठी सीमारेषा ओलांडून गोव्यात येतात. मात्र कर्नाटक पोलिसांनी आघाडी उघडल्याने या व्यवहारावर मर्यादा पडल्या आहेत. गोव्यातील सीमारेषेवरील रहिवासी मासे, भाजी व बाजारहाटासाठी नित्य कारवार बाजारावर अवलंबून आहेत.

Edited By - Prashant Patil

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com