

आसगाव परिसरात सायंकाळी कार आणि थार यांच्यात झालेल्या भीषण धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. मृत व्यक्तीची ओळख भगत राम शर्मा असे समोर आले आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दोन्ही वाहने वेगात असल्याने समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला. अपघातानंतर कारचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला, तर थारलाही मोठे नुकसान झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्यास मदत केली.
काही जणांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. मृत भगत राम शर्मा हे मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.
जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. दरम्यान, अपघातात सामील असलेली पांढऱ्या नंबर प्लेटची कार भाड्याने देण्यात आल्याचे उघड झाले आहे. वाहनाच्या मालकी, चालकाची माहिती आणि अपघाताची नेमकी कारणे याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
वेगमर्यादा ओलांडली होती का, की अन्य तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला, याची चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.