पाळी : कुर्टी - खांडेपार - उसगाव महामार्गावर अपघातांचे सध्या सत्र सुरू असून या अपघातात जखमी होण्याचे प्रकारही घडले आहेत. खांडेपार - ओपा तिठ्यावर आज (बुधवारी) कर्नाटकातील अवजड मालवाहू ट्रकने दोन दुचाकींना धडक दिली. या अपघातात सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही, तरीही दुचाकींची मोडतोड झाली. गेल्या आठवड्याभरात दोन अपघात झाले, मात्र दोन्ही अपघातातील लोक किरकोळ जखमांवर बचावले.
खांडेपार नवीन पुलाच्या जोडरस्त्याचे काम अजूनही रखडले असून केंद्र सरकारच्या रस्ते महामार्ग खात्याने रखडलेल्या जोडरस्त्याच्या पूर्ततेसाठी निधी उपलब्ध केला असला तरी हे काम अजून सुरू झालेले नाही. खांडेपारच्या नवीन पुलाच्या कुर्टी भागाकडील जोडरस्त्याचे काम तेथील एका जुन्या पुराण्या घरामुळे अपूर्ण राहिले होते.
या घराचा वाद न्यायालयात गेल्यानंतर शेवटी हे घर जमीनदोस्त करून जोडरस्त्यासाठी जागा उपलब्ध करण्यात आली, त्यामुळे सुमारे तीन ते चार वर्षे हे काम रखडले होते, पण आता वर्ष उलटून गेले तरी अजून या जोडरस्त्याच्या कामाला सुरवात झालेली नाही.
खांडेपार - ओपा तिठ्यावर जोडरस्त्याचे काम अपूर्ण असल्याने अवजड वाहनचालक खांडेपार - ओपा बाजारातून नव्या पुलावर जाण्यासाठी वळण घेतात. तीव्र उतार त्यातच समोर बाजार परिसर, बाजूलाच प्रवासी बसच्या प्रतीक्षेत उभे, असा प्रकार असल्याने बऱ्याचदा परराज्यातील वाहनचालक बिचकतात, आणि मग अपघात होतो. विद्यार्थ्यांनाही बसची प्रतीक्षा करावी लागते, त्यामुळे बऱ्याचदा या अपघातात विद्यार्थीही सापडतात, त्यामुळे येथील प्रवासी शेडच्या कामाला चालना मिळणे गरजेचे आहे.
- संदीप पारकर ( आरटीआय कार्यकर्ते, खांडेपार)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.