
कांदोळी: मुघल शासक औरंगजेबाचे कौतुक केल्याप्रकरणी समाजवादी पार्टीचे नेते व मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी वादात सापडले असताना, आता त्यांच्या मुलाने गोव्यात राडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. इंडिकेटर न दाखवता कारने दिशा बदलल्यामुळे कांदोळी येथे सोमवारी (०३ मार्च) रात्री मोठा वाद झाला. याप्रकरणी पोलिसांनी अबू आझमींच्या मुलासह इतरांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
कळंगुट पोलिसांनी याप्रकरणी झीऑन फर्नांडिस, जोसेफ फर्नांडिस, फरहान आझमी, शाम आणि इतरांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १९४ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार झालेल्या प्रकारानंतर पोलिसांनी फरहान आझमीसह इतरांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दरम्यान, बीएनएस ३५ अंतर्गत नोटीस जारी करुन त्यांना सोडण्यात आले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, फरहान आझमी मर्सिडीज जी -वॅगन गाडीतून कांदोळी भागातून जात असताना त्यांच्या कारने न्यूटन सुपर मार्केट येथे इंडिकेटर न दाखवता वळण घेतले. यावरुन मोठा वाद झाला. स्थानिकांनी आझमी यांच्या कारभोवती एकत्र येत मोठा गोंधळ घातला. दरम्यान, आझमी यांनी त्यांच्याकडे परवाना असलेली बंदूक आहे असं सांगत बंदुकीचा धाक दाखवला, असा दावा केला जात आहे. यामुळे वाद आणखी चिघळला.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फरहान आझमी यांच्यासह आणखी काही जणांना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न देखील झाला. दरम्यान, कळंगुट पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत चारजणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. कळंगुट पोलिस अधिक तपास करतायेत.
या प्रकरणातील सर्वांना एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्याची संधी देण्यात आली पण, त्यांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिला. तसेच, वैद्यकीय तपासणीसाठी देखील नकार दिला. फरहान आझमी यांनी त्यांच्याकडे असलेल्या बंदुकीचा परवाना दाखवला. हा परवाना गोव्यासाठी लागू असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
दरम्यान, आमदार अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्यभरातून तीव्र पडसाद उमटत आहेत. विधानसभेत देखील यावरुन मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. ‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता’ असं वक्तव्य आझमी यांनी केलं होतं. यावरुन सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले होते. तसेच, आझमी यांच्याविरोधात सर्व स्तरातून टीका झाली. अबू आझमींनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.