Pratima Coutinho: 'आयर्न लेडी' बॅक इन ॲक्शन 'खरी कुजबूज'

Pratima Coutinho: 'आयर्न लेडी' पुन्हा पूर्वीच्या जोमाने रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहे, म्हणजे आता अनेकांची खैर नाही.
Pratima Coutinho | Arvind Kejriwal
Pratima Coutinho | Arvind KejriwalDainik Gomantak
Published on
Updated on

Pratima Coutinho: एकेकाळी काँग्रेस पक्षात मुलुख मैदानी तोफ म्हणून परिचित असलेल्या आणि नंतर ‘आप’मध्‍ये गेलेल्या प्रतिमा कुतिन्हो यांचा मध्यंतरी काही काळ आवाज बंद होता. त्यामुळे कित्येकांना त्या बॅकफूटवर गेल्या असे वाटले. मात्र खरे कारण वेगळेच होते. त्यांच्या गुडघ्‍यावर शस्त्रक्रिया करण्‍यात आल्‍याने त्यांना डॉक्‍टरांनी म्‍हणे विश्रांतीचा सल्ला दिला.

त्यांच्या गुडघ्‍याची वाटी झिजल्याने आता त्यांनी पोलादी वाटी बसविली आहे. यापूर्वी प्रतिमाला ‘आयर्न लेडी’ असे म्हणत असत. आता हे ‘पोलादी’ रोपण केल्यामुळे त्या खरोखरच ‘पोलादी स्त्री’ बनल्या आहेत. त्‍यामुळे ही ‘आयर्न लेडी’ पुन्हा पूर्वीच्या जोमाने रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहे म्हणे. म्हणजे आता अनेकांची खैर नाही, हेच खरे.

कोणाच्या म्हशी, कोणाला उठाबशी!

कचरा समस्या हा सध्या यक्ष प्रश्न बनला आहे. या कचऱ्यामुळे म्हापसा पालिकेस अधूनमधून टीकेला सामोरे जावे लागते. पालिका आपले काम चोख करीत असली तरी काही बेजबाबदार लोकांमुळे पालिकेस बोलणी खावी लागते. त्यामुळे शुक्रवारी या पालिकेने नाईट ऑपरेशन राबवत पालिका क्षेत्रातील रस्त्यांवर रात्रीच्या वेळी कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई केली. या ऑपरेशनमधून पालिकेने एक लाख दंड वसूल केला.

यावेळी शेजारील पंचायत परिसरातील लोक हा कचरा फेकताना आढळले. सध्या काही पंचायतींनी आपल्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनासंदर्भात ठोस पावले उचललेली दिसत नाहीत. परिणामी पंचायत क्षेत्रात कचरा फेकण्याची सोय नसल्याने लोक अशाप्रकारे बेशिस्तपणे मिळेल तिथे कचरा फेकतात.

परिणामी संबंधित पालिका किंवा प्रशासकीय यंत्रणेवर ताण पडतो. सर्वांनी कचरा व्यवस्थापनाची योग्य सोय केल्यास हा विषय बऱ्या‍पैकी सुटू शकतो. अन्यथा म्हापसा पालिकेला ‘कोणाच्या म्हशी, कोणाला उठाबशी’ या म्‍हणीप्रमाणे इतर लोकांच्या चुकीमुळे प्रत्येकवेळी बोलणी ही खावीच लागणार आहे.

अकादमींची चलती

सरकारने आता गोव्यात ‘जागोर’ अकादमी स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. संबंधित लोककलेसाठी जरी ती स्वागतार्ह असली तरी त्यामुळे राज्यात ‘उदंड जाहल्या या अकादम्या’ असे म्हणण्याची वेळ लोकांवर येणार आहे.

अशा अकादमीमुळे सत्ताधारी गटातील काहींची सोय होत असली तरी ज्या हेतूने अशी संस्था स्थापन केली जाते तो वा ते हेतू साध्य होतात का, हा संशोधनाचा विषय आहे असे त्या क्षेत्रातील जाणकारच म्हणत आहेत.

सभापतींचा पुढाकार

गेले अनेक महिने नव्हे तर अनेक वर्षे करमलघाट रस्ता तेथे वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. या रस्त्याचे चौपदरीकरण होईल तेव्हा होवो, पण सदर घाटाचा पायथा ते गुळे भूमिपुरुष देवस्थानापर्यंतचा रस्ता त्वरित चौपदरी करून तेथे होणाऱ्या अपघातांना आळा बसावा म्‍हणून सभापती रमेश तवडकर यांनी तेथील शेतकऱ्यांनी सहकार्य करावे म्हणून घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत होत आहे.

त्‍यामुळे खात्याला रस्त्याचे काम त्वरित हाती घेणे शक्‍य होणार आहे. राज्याच्या अन्य भागांत क्षुल्लक कारणासाठी केला जाणारा विरोध पाहता लोकोपयोगी योजनांसाठी लोकांना उद्युक्त करण्याच्या सभापतींच्या या प्रयत्नांचे अनुकरण अन्य लोकप्रतिनिधींनी केले तर अनेक कामे मार्गी लागतील, अशा प्रतिक्रिया व्‍यक्त होत आहेत.

कोकणी लेखकांचे वाचन

रवींद्र केळेकर यांच्या ‘जपानाक वचून आयलों’ या पुस्तकाचा माया खरंगटे यांनी मराठी अनुवाद केला आहे असा जावईशोध एका पुढं-पुढं करणाऱ्या लेखकाने लावला आहे. ‘वडाची साल पिंपळाला’ करण्यात स्पेशालिस्ट या लेखकाने एका लेखात तसा उल्लेख केला आहे.

मुळात केळेकरांचे हे मराठी पुस्तक आहे ‘जपान जसा दिसला’. ते मराठीच्या एका नामवंत प्रकाशनाने छापलं आहे. त्याचा अनुवाद खरंगटे यांनी केला आहे. खरंगटे यांची पुस्तके न वाचताच स्तुतीपर लेख लिहिला गेला आहे हे सिद्ध होतं. कोकणी लेखकांचं वाचन व दर्जा सुमार आहे हे माया खरंगटे यांचं विधान व वक्तव्य एकंदर सिद्ध झालं.

मराठी, हिंदी, इंग्रजी फार दूर, कोकणी पुस्तकेही न वाचता जे अकलेचे तारे तोडले जातात. हा विषय कोकणीच्या ‘फुडारा’चं द्योतक आहे. खरंगटेंची ‘अमृतवेळ’ कादंबरी किती जणांनी वाचलीय हा संशोधनाचा विषय आहे. कादंबरी व इतर पुस्तके न वाचता मुक्ताफळे उधळली जातात तर मग ही पुस्तके वाचायची कोणी?

चुकांची माफी

काँग्रेसमधून भाजपमध्‍ये गेलेल्या आठ आमदारांना मंत्रिपद किंवा महामंडळ कधी मिळेल ते मिळेल. पण सध्या या आमदारांनी ख्रिसमसनिमित्त समाजमाध्यमांतून जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यातील पहिलीच ओळ ‘आला पहा नाताळ घेऊन आनंद चहूकडे, केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभुंकडे’ अशी आहे.

ही ओळ पाहिल्यानंतर या आमदारांनी अनेक देवतांना फसविल्‍याची पुन्‍हा एकदा आठवण झाली. आता वरील शुभेच्छा संदेशात ‘केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभुंकडे’ म्हटल्याचा अर्थ कोणी कसा घ्यायचा तो घ्या, परंतु नेटकऱ्यांनी मात्र याचा अर्थ आपापल्या परीने लावलेला आहे.

...सारथी कुठे आहेत?

सचिवालय म्हणजे गोवा राज्याचे प्रमुख प्रशासकीय केंद्र. सगळे महत्त्वाचे निर्णय येथूनच घेतले जातात. मंत्रिमंडळ, आमदार, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांचे बस्तान येथेच. सचिवालयाचा एकूणच डामडौल मोठा. त्यामानानेच येथे नोकरदार मंडळी आहेत. पण एका विभागाकडे सरकारचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

सचिवालयाचा एकूण आवाका पाहता तेथे मंत्री, अधिकाऱ्यांच्या दिमतीसाठी किमान 100 वाहने आहेत. त्यात आता नव्या कोऱ्या दहा आलिशान कारची भर पडली आहे. येथे वाहनचालकांची मंजूर पदे 70 आहेत. परंतु गेली काही वर्षे रिक्त झालेल्या जागा न भरल्यामुळे प्रत्यक्षात 35 वाहनचालकच कार्यरत आहेत.

त्यामुळे अटीतटीच्या वेळी राज्यातील इतर ठिकाणच्या कार्यालयांतील चालक सचिवालयात बोलावले जातात. त्यामुळे कुठे तरी कामाचा खोळंबा होतोच. खरे तर राज्यात इतकी बेरोजगारी वाढली असताना ही पदे सरकार का भरत नाही, असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

पोलिसच बनला मटका एजंट!

कुडचडे येथील झुवारी नदीचे पाणी काही वेगळेच असावे. कारण येथे जी प्रकरणे घडतात ती काही औरच असतात. आता हेच बघा ना, कुडचडे वाहतूक पोलिस विभागात एक कॉन्स्टेबल आहे, जो म्हणे स्वतः मटका घेतो. स्वतः मटका घेतो म्हणजे त्याने सगळीकडे आपली माणसे मटका घेण्यासाठी बसविली आहेत. ही माहिती कुडचडे पोलिस स्थानकातील सर्व पोलिसांना माहीत आहे.

पण नव्याने या पोलिस स्थानकावर आलेल्या मोठ्या सायबाला त्याची माहिती नाही. बरे, या पोलिस मटकेवाल्याकडून पोलिसांना हप्ताही मिळत नाही म्हणे. कसा मिळणार? त्याला फक्त हप्ता वसूल करण्याची सवय आहे, द्यायची नाही. पूर्वी कुणा ‘ए’ सायबासाठी म्हणे हाच कॉन्स्टेबल हप्ता वसूल करायचा, आता बोला!

‘फुटबॉल’च्या तिजोरीत प्रकाश

चर्चिल आलेमाव हे अध्यक्ष असताना गोवा फुटबॉल संघटनेच्या तिजोरीत खडखडाट होता. साराच अंधार. त्यामुळे राज्यातील फुटबॉलचा दबदबाही पिछाडीवर गेला होता. मात्र, त्याचे सोयरसुतक चर्चिल यांना नव्हते. ऑक्टोबरमध्ये झालेल्या निवडणुकीत चर्चिलपुत्राचा पराभव झाला.

सौम्य स्वभावाचे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले कायतान फर्नांडिस अध्यक्षपदी निवडून आले. ते स्वतः उद्योजक आहेत. त्यामुळे त्यांना अर्थकारण चांगले अवगत आहे आणि पुरस्कर्ते कसे मिळवावेत, याचेही कौशल्यही त्यांच्याकडे आहे.

संघटनेला नुकताच पहिला पुरस्कर्ता मिळाला. त्यामुळे संघटनेच्या तिजोरीत प्रकाशाचा किरण डोकावलाय. त्यामुळे कायतान आणि संघटनेतील त्यांच्या सहकाऱ्यांचा जोश कायम राहिल्यास फुटबॉलचेच भले होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com