पणजी : राज्यभरात सरकारी नोकऱ्यांच्या बदल्यात पैसे घेण्याचा घोटाळा गाजत असतानाच गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई टाळण्यासाठी पैसे घेतल्याचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. मंडळाच्या सदस्य सचिव डॉ. शमिला मोंतेरो यांनी याप्रकरणी साळगाव पोलिसांत तक्रार दिली आहे.
राज्यभरातील हॉटेल्स रेस्टॉरंटसह छोट्या उद्योगांना स्थापित करण्यासाठी संमती आणि चालवण्यास संमती हे दोन परवाने न घेतल्यावरून मंडळाने सरसकट नोटिसा पाठवणे सुरू केले आहे. काही आस्थापनांवर मंडळाने दंडात्मक कारवाई करणेही सुरू केले आहे.
याचा फायदा घेत ही कारवाई टाळण्यासाठी काहीजणांनी आस्थापनांकडून मंडळाच्या नावे पैसे उकळणे सुरू केले आहे. असे पैसे देऊनही परवाने न मिळालेल्यांनी मंडळाशी संपर्क साधून विचारणा करणे सुरू केल्यावर हा घोटाळा उघड झाला आहे. यातील बहुतांश व्यवहार हे रोख स्वरूपात झाल्याचे त्याचे पुरावे मिळत नव्हते.
या तक्रारीत असेही नमूद केले आहे की, मुरगाव येथील ‘डॅड्स यार्ड’चे मालक अँथनी अँसेल्मो मॅरिआनो रॉड्रिग्स यांनी सुदेश गावसच्या निर्देशानुसार त्यांच्या गुगल पे खात्यावर २४ हजार ९०० रुपये जमा केले होते. या तक्रारीत विविध आस्थापनांच्या मालक-चालकांना संपर्क साधण्यासाठी वापरलेल्या तीन मोबाईल क्रमांकाची माहिती दिली आहे.
मंडळाचे अध्यक्ष डॉ. महेश पाटील म्हणाले, मंडळाच्या नावाचा वापर करून फसवणूक झाली आहे. आजच मोरजीतील व्यावसायिकाला पैशासाठी गावस याने संपर्क साधला आहे. काणकोणातील एका आस्थापनचालकाकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न झाल्यानंतर त्या चालकाने पर्वरीतील मूळ मालकाशी संपर्क साधल्यावर सर्व परवाने असल्याचे समजल्याने त्याने फसवणूक करणाऱ्याला दाद दिली नाही व मंडळाला माहिती दिली. अन्य एक व्यावसायिक गावस याला ९० हजार रुपये देण्यासाठी साळगाव येथील मंडळाच्या कार्यालयापर्यंत पोचला होता. सूरज विवेक पेंडसे नावाने बॅॅंकिंग व्यवहारासाठी ७४९८०८९१७४ हा क्रमांक तो वापरत असे.
विविध आस्थापनांच्या मालक-चालकांना पैसे मागण्यासाठी संपर्क साधण्यात आला. यासाठी ७०२८७६९९०६, ७४९८०८९१७४ आणि ९५५०००८१८६ या मोबाईल क्रमांकांचा वापर झाल्याचे मंडळाने तक्रारीत नमूद केले आहे.
एका व्यावसायिकाकडून ऑनलाईन पैसे स्वीकारल्याचा पुरावा मिळाल्यावर मंडळाने पोलिसांत तक्रार केली आहे. मंडळाने साळगाव पोलिसांना नावे लिहिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की सुदेश गावस नामक व्यक्ती प्रदूषण मंडळाचे अधिकारी असल्याचे सांगून लोकांकडून त्यांच्या युनिटच्या तपासणीसाठी पैसे मागत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.