मडगाव: नवी दिल्लीला (Delhi) आमच्या बरोबर येण्यासाठी आम्ही जयेश साळगावकर (Jayesh Salgaonkar) यांना विमानाचे तिकीटही पाठविले होते मात्र आपले कुणीतरी वारले आहे असे सांगून त्यांनी दिल्लीला येण्याचे टाळले. त्यानंतर त्यांनी आमच्याशी संपर्कच तोडला असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी स्पष्ट करत त्यासाठीच आम्ही त्याला कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे अशी माहिती दिली. गोवा फॉरवर्डचे साळगावचे आमदार जयेश साळगावकर यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेऊन कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सरदेसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
ज्या दिवशी आम्ही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना भेटलो त्यावेळी जयेश आमच्या बरोबर नव्हता. त्या दिवशी पणजीचे आमदार बाबूश मोन्सरात यांनी राहुल गांधींना न भेटणारे आमदार भाजपात जाणार असे वक्तव्य केले होते. साळगावकर यांनी त्यावर कसलाही खुलासा केलेला नाही याचसाठी आम्ही त्यांना नोटीस पाठविली आहे असे सरदेसाई म्हणाले. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार जयेश भाजपचे महामंत्री सतीश धोंड यांच्या संपर्कात असून धोंड यांनीच बाबुशला ते वक्तव्य करण्यास सांगितले होते.
निवडणुकी नंतर आमच्यापैकी कुणी पक्षांतर करू नये यासाठी आम्ही देव बोडगेश्वरासमोर भविष्यात कुठल्याही प्रकारे भाजप बरोबर संबंध ठेवणार नाही अशी शपथ घेतली होती. पण जयेशने निवडणूकीपूर्वीच भाजपशी घरोबा करून आपण देवालाही भीत नाही असे दाखवून दिले आहे. जयेश सारख्या देवावर श्रद्धा असलेल्या आमदाराला फोडण्यासाठी भाजपने बाबुश सारख्या पक्षफोडीत माहीर असलेल्या आमदारांची मदत घेतली असे म्हणावे लागेल असे सरदेसाई म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.