Goa Politics: लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गोवा मंत्रिमंडळातील एका ख्रिस्ती मंत्र्याला डच्चू देऊन त्या जागी काँग्रेस पक्षातून आलेल्या एका ख्रिस्ती आमदाराचा मंत्रिमंडळात समावेश करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. सासष्टी तालुक्यात ख्रिस्ती लोकसंख्येला दिलासा देण्यासाठी ही मोर्चेबांधणी आवश्यक आहे.
‘‘पक्षश्रेष्ठींनी ख्रिस्ती सदस्याला मंत्रिमंडळात घ्यायचे असल्यास हिंदू मंत्र्याला रुष्ट करून नव्हे, तर ख्रिस्ती सदस्यालाच नारळ देऊन त्या जागी नवीन घ्या, असा स्पष्ट सल्ला दिला होता. त्याशिवाय काँग्रेस पक्षातून आठ सदस्य फोडून आणले, त्यावेळी त्यातील एकाला मंत्रिपदाने संतुष्ट करण्याचे वचन पक्षाने दिले होते. त्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने सरकार पक्ष वचन पाळत नसल्याचा संदेश गेला होता,’’ अशी माहिती एका ज्येष्ठ भाजप नेत्याने दै. ‘गोमन्तक’ला दिली.
सध्या गोवा मंत्रिमंडळात बाबूश मोन्सेरात, माविन गुदिन्हो व नीलेश काब्राल असे तीन ख्रिस्ती मंत्री आहेत. या तिघांपैकी कोणाची गच्छंती होणार यासंदर्भात मात्र पक्षात कमालीची गुप्तता आहे. त्यांच्यापैकी कोणाचा पक्षाला फायदा होतो व भविष्याचा विचार करता कोण भाजपला उपयोगी पडू शकतो याची गोळाबेरीज मांडण्याचे काम पक्षसंघटनात्मक पातळीवर सुरू आहे.
मोन्सेरात यांना डच्चू मिळण्याची शक्यता
सूत्रांच्या मते डच्चू मिळू शकणाऱ्या ख्रिस्ती मंत्र्यांमध्ये बाबूश मोन्सेरात यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांनी पक्ष आणि सरकारच्या दैनंदिन कार्यक्रमांपासून जवळजवळ फारकत घेतली असल्याने ते स्वतःच पक्षापासून दूर चालल्याची चर्चा भाजपा संघटनात्मक पातळीवर चालली आहे. गेल्या महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीयमंत्री राजीव चंद्रशेखर गोव्यात आले होते. त्या बैठकीला बाबूश मोन्सेरात गैरहजर होते. त्यानंतर ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ कार्यक्रमातही त्यांचा सहभाग नव्हता व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पणजीत होत असूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
मोन्सेरात - सावंत यांच्यातील अंतर वाढले
पक्षश्रेष्ठींचा उत्पल पर्रीकर यांच्याकडे बघण्याचा सहानुभूतीपूर्वक कल व मोन्सेरात यांची भाजप संघटनेकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती यामुळे मोन्सेरात यांनी भाजप नेत्यांची खप्पामर्जी ओढवून घेतली आहे याबाबत दुमत नाही. मोन्सेरात यांचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याबरोबर राजकीय अंतर वाढले आहे व राज्यात संघटनमंत्री नसल्याने त्यांच्याशी सतत संपर्क साधणारी यंत्रणाही उपलब्ध नाही. शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी बोलावलेल्या बैठकीला पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात अनुपस्थित होते.
उत्पल पर्रीकरांकडे भाजप पक्षश्रेष्ठींचे लक्ष
पणजी मतदारसंघातील स्वतःच्या अस्तित्वाबद्दल बाबूश मोन्सेरात यांना सध्या शंका येऊ लागल्या आहेत. गेल्या निवडणुकीत येथे आश्चर्यकारकरीत्या उत्पल पर्रीकर खूप कमी मतांनी हरले. यानंतर भाजप पक्षश्रेष्ठी उत्पल पर्रीकर यांच्याकडे खूप गंभीरपणे बघायला लागले व पुढील निवडणुकीत भाजपची उमेदवारी उत्पलनाच मिळू शकेल असे संकेत आहेत. उद्योग विषयक एका केंद्रीय समितीवर भाजपात नसतानाही त्यांना स्थान देण्यात आलेले असून लोकसभा निवडणुकीत आपला पाठिंबा भाजपला असेल असे त्यांनी सूचित केले आहे.
पुढील आठवड्यात शपथविधी शक्य
उपलब्ध माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली असून एका नव्या सदस्याचा शपथविधी पुढच्या आठवड्यातच होऊ शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.