धक्कादायक! शेवपुरी खाणं बेतलं जीवावर, दोडामार्गच्या 35 वर्षीय तरुणाचा गोव्यात मृत्यू
फातोर्डा: फातोर्डा येथील स्टेडियमजवळ शेवपुरी खाल्ल्याने एका 35 वर्षीय व्यक्तीचा अचानक उलट्या होऊन मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवारी (24 सप्टेंबर) रात्री घडली. मृत व्यक्तीचे नाव प्रसाद परिथ (वय 35) असून तो महाराष्ट्रातील दोडामार्ग येथील रहिवासी होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद हा फातोर्डा स्टेडियमजवळ शेवपुरी खात असताना अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले. काही क्षणातच त्याला उलट्या होऊ लागल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच फातोर्डा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद 'अनैसर्गिक मृत्यू' म्हणून केली. प्रसादच्या मृत्यूचे नेमके कारण काय आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृतदेहाचा व्हिसेरा विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होऊ शकेल.
ही घटना अनपेक्षित असल्याने रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रसादच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली असून, ते दोडामार्ग येथून गोव्याकडे रवाना झाले आहेत. पोस्टमार्टमनंतर मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे, जेणेकरुन मृत्यूचे खरे कारण समोर येईल आणि दोषींवर योग्य ती कारवाई करता येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.