

Aqua Goa Mega Fish Festival 2026: राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी आणि मच्छिमारांचे जीवनमान उंचावण्यासाठी गोवा सरकारतर्फे ९ ते ११ जानेवारी दरम्यान ९ व्या 'ॲक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हल २०२६' चे आयोजन करण्यात आले आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी मंगळवारी (दि.६) या महोत्सवाची अधिकृत घोषणा केली.
मंत्री हळर्णकर यांनी सांगितले की, राज्य सरकारकडून राबवला जाणारा हा देशातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. या व्यासपीठावर केवळ मासेमारीच नव्हे, तर तज्ज्ञ, धोरणकर्ते, संशोधक, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि उद्योजक एकत्र येणार आहेत. यामुळे मत्स्यव्यवसायातील 'नवकल्पना' (आणि 'ब्लू इकॉनॉमी'ला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल.
मच्छिमारांना त्यांच्या मासळीला योग्य दर मिळावा आणि ती दीर्घकाळ टिकवता यावी, यासाठी सरकारने विशेष पाऊल उचलले आहे. "पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत आम्ही मासळी साठवणुकीसाठी ४० टक्के सबसिडी प्रदान करत आहोत. यामुळे मच्छिमार आपला माल सुरक्षित ठेवू शकतील आणि त्यांना चांगला आर्थिक परतावा मिळेल," असे निळकंठ हळर्णकर यांनी स्पष्ट केले.
हा महोत्सव केवळ व्यवसायापुरता मर्यादित नसून त्यात गोव्याच्या संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. या महोत्सवात लोकनृत्य, स्थानिक म्युझिक बँड्स आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतील. प्रसिद्ध संगीतकार मुकेश घाटवाल यांनी मच्छिमारांच्या सन्मानार्थ रचलेले विशेष गीत महोत्सवाचे आकर्षण ठरेल. तसेच महोत्सवातील सर्व खाद्यपदार्थांचे स्टॉल्स केवळ स्थानिक गोमंतकीयांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत, जेणेकरून स्थानिक समुदायाला याचा थेट आर्थिक लाभ होईल.
मत्स्यव्यवसाय सचिव प्रसन्न आचार्य यांनी नमूद केले की, या महोत्सवाचा मुख्य उद्देश जनजागृती करणे आणि मच्छिमारांना नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. तीन दिवसांच्या या महोत्सवात गोव्याच्या मासळीच्या वैविध्यपूर्ण प्रकारांचा आणि पारंपारिक मासेमारी पद्धतींचाही परिचय करून दिला जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.