Goa News: दक्षिण गोव्यात महिला बेपत्ता होण्याचे आणि लहान मुलांचे अपहरण होण्याचे प्रकार खूपच वाढले आहेत. गेल्या पाच वर्षांत 118 मुलांचे अपहरण झाले तर 705 महिला बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. हे वाढते प्रमाण मोठी चिंतेची बाब बनली आहे. त्यामुळे कित्येक घरे, संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
कौटुंबिक कलह, अनेक प्रकारचे वाद, बिकट आर्थिक परिस्थिती, प्रेमप्रकरणे ही महिला बेपत्ता होण्याची प्रमुख कारणे आहेत. तर, काही महिला गुन्हेगारीच्या विळख्यात अडकून स्वतःचे निवासस्थान सोडून गेलेल्या आहेत. दुसरीकडे लहान मुलांचे अपहरण करण्याचे प्रकारही दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.
अपहरण झालेल्यांपैकी 10 मुलांचा शोध अजूनही पोलिसांना लागलेला नाही. ती कुटुंबे एक ना एक दिवस मूल घरी परत येईल या आशेवर दिवस ढकलत आहेत. बेपत्ता झालेल्या महिलांपैकी 67 जणींचा शोध न लागल्याने त्या कुठे आहेत, कोणत्या अवस्थेत आहेत, जिवंत आहेत की नाहीत, याची काहीही माहिती पोलिस खात्याला प्राप्त झालेली नाही.
दक्षिण गोव्यात 2018 साली 21 मुलांचे अपहरण झाले. 2019 मध्ये 23 मुलांचे, 2020 मध्ये 14 मुलांचे, 2021 मध्ये 12 मुलांचे तर 2022 मध्ये 29 मुलांचे अपहरण झाले आहे. यंदा 2023 मध्ये गेल्या आठ महिन्यांत १९ मुलांचे अपहरण झाल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत.
दुसरीकडे 108 महिला बेपत्ता झालेल्या आहेत. त्यापैकी 100 जणींचा शोध लागला आहे. 2019 मध्ये बेपत्ता झालेल्या 165 पैकी 151 महिलांचा शोध लागला. 2020 मध्ये बेपत्ता झालेल्या 101 महिलांपैकी 96 महिलांचा, 2021 मध्ये 111 पैकी 109 महिलांचा तर 2022 मध्ये 150 बेपत्ता महिलांपैकी 130 जणींचा शोध लागला आहे. 2023 मध्ये आठ महिन्यांत 70 महिला बेपत्ता झाल्या असून, 52 महिलांचा शोध लावण्यास पोलिसांना यश आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.