पणजी: संमग्र शिक्षा अंतर्गत पूर्वप्राथमिक शिक्षकांना सात हजार दरमहा वेतन ही पगार की शिक्षा आहे हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत स्पष्ट करतील का? कार्यक्रमांवर खर्च करण्यासाठी भाजप सरकारकडे अनेक कोटी रुपये आहेत पण कष्टकरी शिक्षकांना योग्य पगार देण्यासाठी पैसे नाहीत, असा आरोप काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केला.
दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विद्यापीठाच्या क्रमवारीत घसरण आणि जीपीएससी परीक्षेसाठी कमी इच्छुकांवर प्रश्न उपस्थित केले होते.
शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पूर्व-प्राथमिक स्तरावरील शिक्षकांना अशी वागणूक दिली जात असेल, तर त्यांच्याकडून भविष्यातील नागरिक घडवण्याची अपेक्षा आपण कशी करू शकतो? असा प्रश्न अमरनाथ पणजीकर यांनी उपस्थित केला.
2012 मध्ये भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून शैक्षणिक क्षेत्राची सर्वच पातळ्यांवर पडझड होत आहे. शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि व्यवस्थापनाचे अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून सुटलेले नाहीत, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.
शाळांचे सेफ्टी ऑडिट करण्यात सरकार अपयशी ठरल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. बालरथ बसेसच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. शाळेचे छत कोसळण्याच्या घटना आणि बालरथ बसेसचे अपघात होऊनही सरकार कोणतीही पावले उचलत नाही, असे पणजीकर म्हणाले.
योग्य सुविधा नसल्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) अंमलबजावणी करणे शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनावर बोजा बनले आहे. सरकार केवळ घोषणा करण्यात व्यस्त आहे.
समग्र शिक्षा अंतर्गत भरती झालेल्या शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठीही सरकारने आता पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे पणजीकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.