कळंगुट: राज्यात नव वर्ष साजरे करणारे पर्यटक (Tourist) बेधुंद अवस्थेत होते. याचा फायदा चोरट्यांनी घेतला. शनिवारी रात्री नववर्षाच्या पूर्वसंध्येला बागा-कळंगुट रस्त्यावरील गर्दीची संधी साधत चोरट्यांनी महागडे मोबाईल तसेच तरुणींच्या पर्सेस हिसकावून पळ काढला. ज्यांचे मोबाईल चोरले गेले, त्यांची मात्र प्रचंड गैरसोय झाली. अनेकांनी एकाच वेळी पोलिसांकडे धाव घेतली होती. अखेर 24 तासांच्या आत पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. 16 जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून तब्बल 65 मोबाईल जप्त करण्यात आले.
कळंगुट (Calangute) आणि बागा (baga) या परिसरात शनिवारी रात्री प्रचंड गर्दी उसळली. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. नववर्ष (New Year) साजरे करण्याच्या ‘मुड’मध्ये पर्यटक होते. त्यामुळे त्यांनाही खबरदारीचे भान नव्हते. हेच हेरून चोरट्यांनी गर्दीत संधी साधली. अनेकांचे महागडे मोबाईल (Mobile) आणि लॅपटॉप व काही महागड्या वस्तू पळवण्यात चोरट्यांनी यश मिळवले. चोरी झाल्यानंतर मात्र अनेकांनी पोलिस स्थानक गाठले. मोबाईल चोरीच्या एकाच वेळी अनेकांच्या तक्रारी आल्याने ही चोरी टोळीकडून झाल्याचा संशय आला. त्यांच्या शोधात कळंगुट पोलिसांनी (Goa Police) मोहीम सुरू केली. 24 तासांच्या आतच त्यांनी चोरट्यांना पकडले. साठपेक्षा जास्त मोबाईल जप्त केल्याची माहिती कळंगुटचे निरीक्षक लक्षी आमोणकर यांनी दिली.
दोन पोलिसांच्या तत्काळ बदल्या
मंगळवारी रात्री कळंगुटमधील सोझा लोबो रेस्टॉरंटवर झालेल्या हल्लाप्रकरणात बेफिकीरपणा केल्याच्या आरोपावरून तत्कालीन निरीक्षक नोलास्को रापोझ यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी पोलिस कॉन्स्टेबल विनय श्रीवास्तव तसेच अन्य एकाची पणजीत बदली करण्यात आली आहे. तसा आदेश महानिरीक्षकांनी काढला. सध्या दोन्ही कॉन्स्टेबल्सचे निलंबन झाल्याची माहिती पुढे आली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.