मडगाव : गोव्यात समुद्र किनाऱ्यावर उघड्यावर मद्यप्राशन करण्यास बंदी असली तरी पर्यटकांनी या बंदीला केराची टोपली दाखवल्याचं चित्र आहे. खुलेआम उघड्यावर मद्यप्राशन करत बसलेले पर्यटक हे दृश्य सर्व किनाऱ्यावर दिसत असून दारु पिऊन झाल्यावर काचेच्या बाटल्या तिथे किनाऱ्यावरच टाकून दिल्या जात असल्याने एक नवीन समस्या निर्माण झाली आहे. याच काचेच्या बाटल्यांमुळे अनेकजण जखमी होत असल्याचं वास्तव आता समोर आलं आहे.
कित्येक वेळा या फुटलेल्या बाटल्यामुळे किनाऱ्यावर रेतीत अनवाणी फिरणारे पर्यटक जखमी होत असून त्यात लहान मुलांचाही समावेश आहे. मागच्या दोन वर्षात याच फुटलेल्या काचेच्या बाटल्यांमुळे 60 पर्यटक जखमी झाल्याची माहिती दृष्टी मरिन लाईफसेव्हर्सकडून देण्यात आली आहे. अशा जखमी पर्यटकांची मलमपट्टी दृष्टीकडून केली जात आहे. देशी पर्यटकांची गर्दी सर्वात जास्त असते त्या बागा, कळंगुट (Calangute) किनारपट्टीत हे प्रकार जास्त आढळून आले असून किमान 90 टक्के प्रकरणे याच भागातील असल्याची माहिती मिळाली आहे.
ख्रिसमस आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यास समुद्रावर येणाऱ्या पर्यटकांकडून हे प्रकार जास्त होतात असे आढळून आले आहे. त्याच दरम्यान अन्य पर्यटक काच लागून जखमी होण्याच्या घटना घडत असतात असे दृष्टीचे ऑपरेशन हेड नवीन अवस्थी यांनी सांगितले.
मागच्या वर्षी एका लहान मुलाच्या पायाला काच लागल्याने त्याला इस्पितळात (Hospital) हलवावे लागले होते. त्यावेळी जखम एवढी खोल होती की टाके घालून हा घाव बंद करावा लागला होता.
जीवरक्षक म्हणून काम करणाऱ्या चार्मिन डिसोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतेकवेळा लहान मुलेच जखमी होत असल्याचे दिसून आले आहे. कित्येकदा पर्यटक (Tourist) दारुच्या बाटल्या समुद्रात फेकून देत असतात. लाटांबरोबर त्या बाटल्या किनाऱ्याकडे वाहून येत असताना मध्ये खडकावर आपटून फुटतात. त्यामुळे या काचा किनाऱ्यावर येत असतात. अशा काचांमुळे अनेक पर्यटकांना तसेच किनाऱ्यावर फेरफटका मारणाऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.