Panaji News : शवागारातील ५५ मृतदेह ‘मोक्षा’च्या प्रतीक्षेत

Panaji News : या मृतदेहाच्या विल्हेवाटीसाठी आरोग्य, पोलिस तसेच जिल्हाधिकारी कोणीच पावले उचलत नसल्याने या मृतांना मोक्ष मिळालेला नाही. विल्हेवाटीची जबाबदारी पोलिसांच्या मदतीने पंचायती व पालिकांची असूनही निधीअभावी हा प्रश्‍न अधिक गुंतागुंतीचा बनला आहे.
Panaji
Panaji Dainik Gomantak

Panaji News :

पणजी, राज्यातील गोमेकॉ इस्पितळ तसेच जिल्हा व उपजिल्हा इस्पितळांमध्ये सुमारे ५५ अज्ञात मृतदेह अनेक वर्षापासून विल्हेवाटीविना पडून आहे.

या मृतदेहाची विल्हेवाटीच्या जबाबदारीवरून जिल्हाधिकारी व फोरेन्सिक मेडिसिन विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये ‘तू तू मैं मैं’ सुरू आहे. शवागारात पडून असलेले हे मृतदेह ८ वर्षापासून ते तीन महिने या कालावधीमधील आहे.

या मृतदेहाच्या विल्हेवाटीसाठी आरोग्य, पोलिस तसेच जिल्हाधिकारी कोणीच पावले उचलत नसल्याने या मृतांना मोक्ष मिळालेला नाही. विल्हेवाटीची जबाबदारी पोलिसांच्या मदतीने पंचायती व पालिकांची असूनही निधीअभावी हा प्रश्‍न अधिक गुंतागुंतीचा बनला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उत्तर गोव्यातील गोमेकॉ इस्पितळ तसेच आझिलो इस्पितळात मिळून ३६ अज्ञात पुरुष मृतदेह विल्हेवाटीविना पडून आहेत. त्यामध्ये २०१६ पासून शवागारात असलेल्या २ मृतदेहांचा समावेश आहे. यामध्ये एकाही महिलेच्या मृतदेहाचा समावेश नाही. ३ विदेशी नागरिकांच्या मृतदेहाचा समावेश असून ते जर्मन, रशिया व ब्रिटिश देशातील आहेत. या देशांच्या राजदूताशी संपर्क साधूनही त्यांची ओळख पटलेली नाही.

गोमेकॉ इस्पितळातील शवागारात मृतदेह ठेवण्यासाठी १२० कॅबिनेट्स व सुमारे १०० ट्रॉलीस आहेत. या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासंदर्भातचा कृती आराखडा (ॲक्शन प्लॅन) सध्या नाही. त्यामुळे प्रत्येक विभाग आपापल्यावरील जबाबदारी झटकू पाहत आहे. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ, फोंडा उपजिल्हा इस्पितळ मिळून सुमारे १९ अज्ञात मृतदेह दोन आठवडे ते सहा महिन्यांपासून पडून आहेत. त्यामध्ये शिवानी जाधव (१९) या महिलेच्या मृतदेहाचा समावेश आहे.

तीन महिने उलटून गेले तरी तिच्या कुटुंबियांनी संपर्क साधलेला नाही. उर्वरित १८ मृतदेह पुरुषांचे आहेत. या मृतदेहांचे वय १९ ते ६० वर्षापर्यंतचे आहे. बहुतके मृतदेह हे भिकाऱ्यांचे आहेत. त्यातील काहींचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी ते ताब्यात घेऊन व पंचनामा करून ते शवागारात आणून दिले आहेत तर काहीजणांचा इस्पितळात उपचार सुरू असताना मृत्यू झाले आहेत.

या फोसेन्सिक मेडिसिनच्या शवागारात पावसात गळती होत असल्याची तक्रार सरकारकडे करून त्याची डागडुजी करण्याची विनंती करण्यात आली होती. नव्यानेच आरोग्य सचिवपदाचा ताबा घेतलेल्या आयएएस अधिकाऱ्यांनी भेट दिली असता अनेक वर्षे पडून असलेल्या अज्ञात मृतदेह पाहून आश्‍चर्यचकित झाले.

त्यांनी लगेच गोमेकॉ डीनना याबाबत पावले उचलण्याचे निर्देश देताच हालचालीसुरू झाल्या होत्या. फोरेन्सिक मेडिसिनच्या विभागाकडून शवागारात पडून असलेल्या मृतदेहाच्या विल्हेवाटीसाठी पावले उचलण्यात येत असला तरी त्याचा पाठपुरावा केला जात नाही. पोलिस पंचनामा करून हे अज्ञात मृतदेह शवागारतच ठेवतात. या पोलिसांच्या बदल्या झाल्या की ज्याच्याकडे हे प्रकरण सोपवले जाते त्याला काही माहीत नसते.

त्यामुळे पोलिस स्थानकाच्या प्रमुखांनी जो तपास अधिकारी आहे त्याला त्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याशिवाय मुक्त करू नये. तसे केल्यास या अज्ञात मृतदेह शवागारात वर्षानुवर्षे पडून राहण्याचे प्रमाण कमी होईल असे मत फोरेन्सिक मेडिसीन विभाग प्रमुख आंद्रे फर्नांडिस यांनी व्यक्त केले.

मृतदेह शवागारात अनेक वर्षे पडून राहण्यास पोलिसांबरोबर अधिक तर पंचायती व पालकांची जबाबदारी आहे. मृतदेह ज्या पंचायत वा पालिका क्षेत्रात सापडला त्याची विल्हेवाटीसाठी लागणारा खर्च कोणी सोसायचा हा प्रश्‍न उभा राहतो. पंचायत व पालिका निधी नसल्याचे सांगून त्याकडे पाठ फिरवतात.

Panaji
Goa Accident: झोपेत असताना काळाचा घाला, वेर्णा IDC मध्ये बसने चिरडल्याने बिहारच्या 4 कामगारांचा मृत्यू, 5 जखमी

कृती आराखड्याची गरज

जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन हा प्रश्‍न सोडवण्याची गरज आहे. त्यासाठीची बैठक गेल्या शुक्रवारी निश्‍चितही करण्यात आली होती, मात्र ती रद्द झाली. अज्ञात मृतदेहाची विल्हेवाट नव्हे तर त्याचा अंत्यविधी असतो. हा अंत्यविधी पोलिसच स्वतःचे पैसे खर्च करून प्रकरण बंद करतात. त्यामुळे योग्य कृती आराखड्याची आवश्‍यकता आहे, असे मत फोरेन्सिक मेडिसिन विभाग दक्षिण जिल्हा इस्पितळ प्रमुख मधु घोडकिरेकर यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com