डिचोली: पूर्ण शाकाहारी म्हणून ओळखण्यात येणाऱ्या श्रावण महिन्याला उद्या सोमवारपासून प्रारंभ होत असून, श्रावण मासारंभाच्या पूर्वदिनी आज (रविवारी) डिचोलीत मासळीसह चिकन, मटण खरेदीला प्रचंड तेजी आली होती. उद्यापासून साधारण दीड महिने मांसाहारी पदार्थ खायला मिळणार नसल्याने खवय्यांनी आज सकाळपासूनच चिकन, मटण तसेच मासळी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती.
आजच्या एकाच दिवसात डिचोली बाजारात चिकन, मटण आणि मासळी खरेदीतून जवळपास ५ लाखांहून अधिक रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. श्रावण महिना म्हटला की, शाकाहाराचा काळ. हिंदू धर्मात या महिन्याला धार्मिक उत्सव, सणांचे तसेच शास्रोक्त महत्व आहे.
बहूतेकजण पूर्ण श्रावण महिना ते चतुर्थीनंतर येणाऱ्या अनंतचतुर्दशीपर्यंत मांसाहार वर्ज्य करतात. यंदा उद्या सोमवारपासून श्रावण मासारंभ होत आहे. रविवार असल्याने आज मासळीसह चिकन, मटण आणि अंडी खरेदीला तेजी आली होती.
श्रावण मासारंभाच्या पूर्वदिनी डिचोलीत ब्रॉयलर कोंबड्यांची आवक वाढली होती. आज काही चिकन सेंटरमधून बॉयलर कोंबडी १८० ते १९० रू. किलो तर काही चिकन सेंटरमधून १६० रुपये किलो असे दर होते. सुटे चिकन २५० रुपये किलो दराने विकण्यात येत होते. बकऱ्याचे मटण मात्र हजार रू. किलो या दराने विकण्यात येत होते.डिचोलीत दररोज सरासरी एक हजार ते बाराशे किलो चिकनची विक्री होत असते. आज त्यात दुप्पट वाढ झाल्याची माहिती एका चिकन विक्रेत्याकडून मिळाली.
दुसऱ्या बाजूने आज रविवारी बाजारात बांगडे, कोळंबी आदी समुद्रातील ठराविक मासळीच उपलब्ध होती. गावठी मासळीही उपलब्ध होती. मागील महिन्यापासून वाढलेले मासळीचे दर स्थिर आहेत. काळुंदरे, कोळंबी, मुड्डश्यो ४०० रुपये किलो दराने विकण्यात येत होती. मोठे बांगडे ५० रु. नग, तर गावठी कोळंबी आकारानुसार १०० ते २०० रुपये वाटा या दराने विकण्यात येत होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.