Zuari Bridge नव्या झुआरी पुलावरून पणजीहून मडगावकडे जाण्यास फक्त अवजड वाहनांनाच परवानगी आहे. तरीही इतर वाहने वाहतूक करत असल्याने आज, मंगळवारी वाहतूक पोलिस विभागाने अकस्मात कारवाई करत सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना चांगलाच दणका दिला.
यात पोलिस खात्याच्या एटीएस वाहनासह काही सरकारी वाहनांनाही कारवाईला सामोरे जावे लागले. आज सकाळपासून सुरू केलेल्या या कारवाईत दुपारपर्यंत सुमारे ३०० वाहनांवर कारवाई केली.
१४४ चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करून चलन दिले, तर सुमारे १५० हून अधिक वाहनमालकांच्या पत्त्यावर नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
नवा झुआरी पूल दोन्ही बाजूंनी वाहतुकीस खुला केला असला, तरी त्यामध्ये काही अटी घातल्या आहेत. अजून या पुलाला समांतर पुलाचे काम सुरू आहे.
जुन्या झुआरी पुलावर होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन हा नवा झुआरी पूल खुला केला आहे. पणजीहून मडगावकडे जाण्यासाठी तो फक्त अवजड वाहनांसाठी (12 टन वजनापेक्षा अधिक) खुला करताना इतर वाहनांसाठी तो बंद ठेवला आहे.
मडगाव वा वास्कोहून पणजीकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी तो खुला आहे. त्यामुळे पणजीत येणाऱ्या अवजड वाहनांसाठी तो इतर वाहनांना त्यावरून वाहतूक करता येते. जुना झुआरी पूल हा 12 टन व त्यापेक्षा कमी वजनाच्या वाहनांसाठी सध्या खुला आहे.
नव्या झुआरी पुलावरून 12 टनपेक्षा कमी वजनाच्या वाहनांना मडगावकडे जाण्यास बंदी आहे. तरीही दुचाकी व चारचाकी वाहनचालक सूचनांचे उल्लंघन करत असल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे आज या विभागाने अकस्मात नव्या झुआरी पुलावर मडगावच्या दिशेने जाणाऱ्या १२ टनपेक्षा कमी वजनाच्या वाहनांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली.
- बॉस्युएट सिल्वा, पोलिस अधीक्षक.
७२,५०० रुपयांचा महसूल जमा-
मंगळवारी १४४ वाहनचालकांना चलन देऊन ७२,५०० रुपये महसूल जमा केला. कारवाई करताना वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून काही वाहनचालकांची छायाचित्रे घेऊन त्यांना जाण्यास सांगितले. मात्र, या छायाचित्रांद्वारे त्या वाहनमालकाच्या पत्त्यावर नोटीस पाठवण्यात येणार आहे. ही कारवाई पुढील काही दिवस सुरूच राहणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.