मडगाव: गोवा हे शिक्षित राज्यांपैकी एक असे समजले गेेले असले तरी या राज्यातील शिक्षणाचा मूळ पाया ठिसूळ तर नाही ना, असे वाटण्याजोगी राज्यातील स्थिती आहे. राज्यातील ६८८ सरकारी प्राथमिक शाळांपैकी २५४ शाळा या एकशिक्षकी असून या शाळात आवश्यक त्या सुविधाही नसल्याचे दिसू्न येते. ही एकशिक्षकी शाळांची एकूण आकडेवारी ३६.९१ टक्के असून यात सत्तरी आणि फोंडा तालुक्यातील एकशिक्षकी शाळांची संख्या सर्वांत अधिक आहे.
हल्लीच विधानसभेत झालेल्या पावसाळी अधिवेशनात ही माहिती पुढे आली आहे. सरकारी प्राथमिक शाळांतून विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत चालली असून त्याचा फटका शिक्षक भरतीवर झालेला दिसून येत आहे. असे जरी असले तरी पहिली ते चौथीपर्यंत चार वर्गांतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी एकच शिक्षक असणे ही चांगली स्थिती नसून त्यामुळे शिक्षणाचा पायाच डळमळीत हाेण्याची भीती शिक्षण क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
सर्वांत जास्त एकशिक्षकी शाळा सत्तरी आणि फोंड्यात असून या दोन्ही तालुक्यांतील प्रत्येकी ६२ शाळा एकशिक्षकी आहेत. त्यानंतर सांगे तालुक्याचा क्रमांक लागतो. या तालुक्यात ४२ प्राथमिक शाळा एकशिक्षकी आहेत. केपे (१९), सासष्टी (१७), तिसवाडी (१३), डिचाेली (१०), बार्देश व मुरगाव (प्रत्येकी ७), धारबांदोडा व काणकोण (प्रत्येकी ६) तर पेडणे तालुक्यात ५ शाळा एकशिक्षकी आहेत.
याशिवाय सांगे आणि काणकोण तालुक्यातील प्रत्येकी दाेन माध्यमिक शाळा एकशिक्षकी असून राज्यात एकूण ७८ सरकारी माध्यमिक विद्यालये आहेत, त्यातील दोन विद्यालयांत पाचवी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकच शिक्षक शिकवितो.
पूर्वाश्रमीच्या शिक्षिका आणि सध्याच्या गोवा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष बीना नाईक यांनी सरकारी अनास्थेचा हा उत्कृष्ट नमुना, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. प्राथमिक स्तरांवरील शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया असतो. तोच जर ठिसूळ झाला तर या शिक्षणातून तयार होणारी विद्यार्थ्यांची पिढी पुढे सक्षम कशी होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गोव्यात डीएड, बीएड आणि एमएड केलेले कित्येक विद्यार्थी बेकार आहेत. अशा विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये नोकऱ्या का मिळू नयेत, असा सवाल त्यांनी केला.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविण्याचा कुठलाही प्रस्ताव शिक्षण खात्याकडे आलेला नाही, असे उत्तर शिक्षण खाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिले होते. असे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी अर्थसंकल्पात कुठलीही तरतूद केलेली नाही, हेही त्यांनी आपल्या उत्तरातून स्पष्ट केले होते.
बदलापूर (महाराष्ट्र) येथे प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनीवर झालेला लैंगिक अत्याचार ही धक्कादायक बाब आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आला आहे. गोव्यात जर जवळपास ३७ टक्के शाळा एक शिक्षकी असल्यास हा एकच शिक्षक शाळांतील सर्व मुलांवर लक्ष ठेवणार तरी कसा? त्याशिवाय पहिली ते चौथी या इयत्तांतील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणांबरोबरच नैतिक मूल्येही शिकवावी लागतात. एक शिक्षक हे सर्व शिक्षण या मुलांना कसा देऊ शकेल, हाच खरा प्रश्न आहे.
बीना नाईक, निवृत्त शिक्षिका
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.