Goa Mining : खाण आणि भूगर्भशास्त्र संचालनालयाने राज्यातील खाणकाम बंद झाल्यामुळे ज्या लोकांना फटका बसला आहे, त्यांच्यासाठी लाभदायी ठरतील अशा स्वरूपाचे प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी खाणपट्टा असलेल्या भागात १७७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. गणेश चतुर्थीच्या तोंडावर सरकारने ही घोषणा केल्याने यंदा खाण अवलंबितांना चतुर्थीआधीच गणपती बाप्पा पावला आहे.
खाण संचालनालयाने उत्तर गोवा जिल्हा मिनरल फाऊंडेशन ट्रस्ट आणि दक्षिण गोवा जिल्हा मिनरल फाऊंडेशन ट्रस्टसोबत काम करण्यासाठी राज्य स्तरावर प्रकल्प व्यवस्थापन केंद्रही (पीएमयू) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा मिनरल फाऊंडेशन ट्रस्टने 2015 साली राज्यात प्रकल्प सुरू केले. प्रभावित क्षेत्रांना लाभ देणारे प्रकल्प शोधणे, तसे प्रस्ताव पाठवणे, समुदायाचे हितसंबंध जपणे, डेटा व्यवस्थापन आणि अहवाल यांसाठी विविध विभागांशी प्रकल्प व्यवस्थापन केंद्र समन्वय साधेल,असे सूत्रांनी सांगितले.
राज्य स्तरावरील प्रकल्प व्यवस्थापन केंद्राकडे पंंचायत, जिल्हा पंचायत व शहरी स्थानिक स्वराज संस्थांकडून आलेल्या प्रस्तावांची छाननी केल्यानंतर त्यासंबंधीचे काम सुरू केले जाणार आहे. सरकारी विभाग, मंडळे, कॉर्पोरेशन आणि राज्याच्या किंवा केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा व्यक्तींकडून यापैकी कोणत्याही एजन्सीद्वारे प्रस्ताव पाठवावे लागणार आहेत.
या प्रकल्प व्यवस्थापन केंद्राने निर्धारित केलेल्या आणि दिलेल्या कालावधीत प्रस्तावित योजना आणि प्रकल्पांसह वार्षिक योजना, वार्षिक उलाढाल आणि ट्रस्टचे समन्वय, एकत्रिकरण यांचा अहवाल तयार केला जाणार आहे.
ट्रस्टची स्थापना
राज्य सरकारने राज्यातील दोन्ही जिल्ह्यांत खनिज फाऊंडेशन ट्रस्टची स्थापना केली आहे. जिल्हा खनिज निधी खाणकामाशी संबंधित कामांमुळे प्रभावित झालेल्या लोकांना फायदा मिळावा, या उद्देशाने स्थापन केला आहे. आतापर्यंत दक्षिण गोवा जिल्हा मिनरल फाऊंडेशन ट्रस्टकडे सध्या ९१ कोटी रुपये असून त्यातील २४ प्रकल्पांसाठी २७ कोटी रुपये, तर उत्तर गोवा जिल्हा मिनरल फाऊंडेशन ट्रस्टकडे ८६ कोटी रुपये शिल्लक आहेत, त्यातील ३१ प्रकल्पांसाठी ४८.५ कोटी रुपये मंजूर केले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.