Panaji Smart City Work : गोव्यात सध्या स्मार्ट सिटीवरुन चांगलाच गदारोळ सुरू आहे. स्मार्ट सिटीच्या कामामुळे रस्त्याची दूरवस्था झाली आहे. ज्यामुळे शहरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याबाबतच आता नवीन माहिती समोर आली आहे. राजधानीतील 'स्मार्ट सिटी' प्रकल्पात 1000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत काँग्रेसच्या गोवा युनिटने शुक्रवारी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
शहरातील स्मार्ट सिटीच्या कामामुळे तीन भीषण अपघात झाले. त्यानंतर एल्विस गोम्स यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेत्यांनी ‘स्मार्ट सिटी’ कार्यालयाला घेराव घातला आणि संथगतीने चाललेल्या या कामावर प्रश्न उपस्थित केले. यावेळी काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर, जनार्दन भंडारी, वरद मार्दोळकर आदी उपस्थित होते.
यावेळी, एल्विस गोम्स म्हणाले, या कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नाही. ते कधीही कार्यालयाला भेट देत नसल्याचं आम्हाला समजलं आहे. त्यामुळे कामाच्या संथ गतीने लोकांचे हाल होत आहेत. हा एक हजार कोटींचा घोटाळा आहे. भाजप सरकार चाणाक्षपणे पैसे लुटत आहे.
ते म्हणाले, शहरातील नागरिकांना मोकळी जागा देण्याऐवजी कामात गुंतलेले कंत्राटदार सुरक्षेचे कोणतेही उपाय न वापरून लोकांना त्रास देत आहेत. आम्ही या संदर्भात 50 प्रश्न उपस्थित केले आहेत. आम्हाला या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. सरकार कार्निवलच्या मूडमध्ये आहे असे दिसते आणि त्यामुळे जनतेला वेदना देणार्या मुद्द्याकडे त्यांनी नजर फिरवली आहे.
लोकोपयोगी कामात सर्वांना सहभागी करून घेणे हे केंद्र सरकारचे मार्गदर्शक तत्त्व होते. हे एक नागरिक-केंद्रित मिशन असावे. परंतु या प्रकल्पाबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही. अगदी वेबसाइटही बंद आहे, असे म्हणत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
हा मोठा घोटाळा आहे. काम योग्य पद्धतीने न झाल्यास आम्ही योग्य ती पावले उचलू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
अमरनाथ पणजीकर म्हणाले की, स्मार्ट सिटी प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी मध्य प्रदेशातील गोव्यातील आमदारांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यापेक्षा त्यांनी आधी पणजी शहराची परिस्थिती पाहावी. काम सुरू असताना अपघात होत आहेत. पण सरकारला त्याची पर्वा नाही.
भाजप सरकार राज्याच्या तिजोरीची लूट करण्यात 'अतिरिक्त स्मार्ट' झाले आहे. आम्हाला या कामात पारदर्शकता हवी आहे. आम्हाला कामाचा दर्जा जाणून घ्यायचा आहे. या प्रकल्पाचे काम करताना सुरक्षितता असली पाहिजे. मात्र यातले काहीच होताना दिसत नाही.
जनार्दन भंडारी म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कामामुळे नागरिक आणि गोव्यात येणाऱ्या पर्यटकांचे हाल होत आहेत. भाजप सरकार निकृष्ट दर्जाची कामे करून पैसे लुटण्याचा प्रयत्न करत आहे.
वरद मार्दोळकर म्हणाले की, पणजी शहरात पायी जाणेही धोकादायक आहे. या स्मार्ट सिटी प्रकल्पात झालेला घोटाळा उघडकीस आणण्यासाठी आम्ही नक्कीच पावले उचलू.
या प्रकरणी काँग्रेस संबंधित 40 जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.