
पणजी: गोव्याची आघाडीची पॅरा ॲथलीट, राष्ट्रीट-आंतरराष्ट्रीय पदकविजेती साक्षी काळे पॅरिसमध्ये होणाऱ्या जागतिक ग्रांप्री पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी सज्ज झाली असून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी होणारी ती एकमेव गोमंतकीय पॅरा खेळाडू आहे.
साक्षी पॅरिसमधील जागतिक ग्रांप्री स्पर्धेत महिलांच्या टी-१३ प्रकारातील ४०० मीटर व १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भाग घेईल. बंगळूर येथून २९ रोजी साक्षी पॅरिसला रवाना होईल. स्पर्धा ३१ मे ते ५ जून या कालावधीत होत आहे. पॅरिसमधील स्पर्धेत भारताचा २३ सदस्यीय संघ सहभागी होणार आहे.
परदेशी जागतिक ग्रांप्री स्पर्धेत भाग घेण्याची साक्षी हिची ही पहिलीच वेळ आहे. यावर्षी मार्च महिन्यात नवी दिल्ली येथे झालेल्या जागतिक ग्रांप्री पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत साक्षी सहभागी झाली होती आणि पहिल्याच प्रयत्नात तिने १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत १४.८८ सेकंद वेळेसह रौप्यपदक जिंकले होते.
पॅरिसमधील जागतिक ग्रांप्री पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झालेल्या साक्षी हिला वेदांता सेझा गोवाचे पाठबळ लाभत आहे. वेदांता सेझा गोवाचे सीईओ नवीन जाजू यांनी साक्षी हिचे अभिनंदन केले, तसेच तिला स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. गोवा पॅरालिंपिक असोसिएशनचे सचिव सुदेश ठाकूर यांनीही साक्षी हिला शाबासकी दिली आहे. उसगाव येथील गोव्याची ही अव्वल पॅरा ॲथलीट खांडोळा सरकारी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.
डिसेंबर २०२३ ः खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये १०० मीटरमध्ये ब्राँझ, लांबउडीत रौप्य
जानेवारी २०२४ ः २२व्या राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्समध्ये लांबउडीत सुवर्ण, १०० मीटरमध्ये ब्राँझ
फेब्रुवारी २०२५ ः २३व्या राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्समध्ये १०० मीटरमध्ये सुवर्ण, २०० मीटरमध्ये सुवर्ण, लांबउडीत रौप्य
मार्च २०२५ ः दिल्ली येथील जागतिक पॅरा ग्रांप्री ॲथलेटिक्समध्ये १०० मीटरमध्ये रौप्य
मार्च २०२५ ः दुसऱ्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये १०० मीटरमध्ये सुवर्ण
‘‘भारताचे जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने मी अतिशय आनंदित आहे, तसेच पॅरा-ॲथलीट्सना पाठबळ आणि सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मी भारत सरकारला धन्यवाद देते. माझ्या कारकिर्दीच्या प्रत्येक टप्प्यावर साथ आणि मार्गदर्शन केल्याबद्दल मी गोवा पॅरालिंपिक असोसिएशनचेही आभार मानते. वेदांता सेझा गोवा यांनी मला खूप सहकार्य केले असून त्यांचे सहकार्य ही माझ्यासाठी फार मोठी मदत आहे. त्यांच्या पाठबळामुळे भारतासाठी यश मिळवण्याचा माझा निर्धार अधिक बळकट झाला आहे.’’
साक्षी काळे, पॅरा ॲथलीट
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.