
पणजी: हरहुन्नरी युवा अष्टपैलू यश कसवणकर याने एकहाती झुंज देताना नाबाद शतक झळकावले, पण त्याचे इतर सहकारी गांभीर्याने खेळले नाहीत, परिणामी २३ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी गोव्याला जम्मू-काश्मीरकडून ७२ धावांनी पराभूत व्हावे लागले.
गोव्याला ‘ड’ गटातील सहा लढतीतील पाचवा पराभव पत्करावा लागल्यामुळे सात संघांत सहावा क्रमांक मिळाला.
छत्तीसगडमधील रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर झालेल्या या लढतीत जम्मू-काश्मीरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ३३० धावा केल्या. त्यांच्या दोघा फलंदाजांनी गोव्याच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत शतके ठोकले.
काझी जुनेद मासूद याने १२० चेंडूंत नऊ चौकार व एका षटकारासह १०६ धावा, तर कर्णधार कन्हैया वाधवान याने अवघ्या ६४ चेंडूंत नाबाद १०५ धावा करताना दहा चौकार व तीन षटकार लगावले. जम्मू-काश्मीरचा हा सहा सामन्यांतील चौथा विजय ठरला. १६ गुणांसह त्यांना गटात दुसरा क्रमांक मिळाला. सहाही सामने जिंकलेल्या मध्य प्रदेश संघ गटात अव्वल ठरला.
प्रत्युत्तरादाखल गोव्याला ३३१ धावांचे आव्हान झेपले नाही. त्यांना निर्धारित ५० षटकांत ७ बाद २५८ धावाच करता आल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या यश कसवणकर याने कमालीची जिगर प्रदर्शित केली. लढाऊ बाणा प्रदर्शित करताना त्याने ९६ चेंडूंत नऊ चौकार व एका षटकारासह त्याने नाबाद १०० धावा केल्या. आयुष वेर्लेकर याने ६७ चेंडूंत ४६ धावा केल्या, पण गोव्याचे बाकी फलंदाज खेळपट्टीवर टिच्चून खेळू शकले नाही.
कसवणकरची २०२४-२५ मधील कामगिरी
- १९ वर्षांखालील कुचबिहार करंडक (चार दिवसीय सामने) स्पर्धेतील ५ सामन्यांत ३३८ धावा, १ शतक व १ अर्धशतक, शिवाय १२ विकेट
- १९ वर्षांखालील विनू मांकड करंडक (एकदिवसीय सामने) स्पर्धेतील ५ लढतीत एका अर्धशतकासह १७७ धावा, ८ विकेट
- २३ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेतील ६ सामन्यांतील ५ डावांत १ शतक व १ अर्धशतक नोंदवत २११ धावा, ३ विकेट
सहा सामन्यांत १९ खेळाडू
गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए) २३ वर्षांखालील वयोगटातील स्पर्धेबाबत गंभीर नसल्याचे जाणवले. एकदिवसीय स्पर्धेतील सहा सामन्यांतून मिळून गोव्याच्या संघांतून एकूण १९ क्रिकेटपटू खेळले. एकंदरीत जीसीएने या वयोगटात प्रयोगावरच जास्त भर दिल्याचे दिसले. गोव्याने पाच सामने गमावले, फक्त दुबळ्या अरुणाचल प्रदेशविरुद्ध एक विजय मिळविला.
संक्षिप्त धावफलक
जम्मू-काश्मीर: ५० षटकांत ६ बाद ३३० (काझी जुनेद मासूद १०६, यावर हसन ४९, कन्हैया वाधवान नाबाद १०५, मुसैफ अझाझ २३, लखमेश पावणे ९-०-५४-२, अमित यादव १०-१-६५-२, मेहंक धारवाडकर ७-०-४४-०, उदित यादव ८-०-४६-१, शदाब खान ७-०-४५-१, यश कसवणकर ८-०-५७-०, अझान थोटा १-०-१४-०)
वि. वि. गोवा: ५० षटकांत ७ बाद २५८ (अझान थोटा २७, गौरेश कांबळी २७, आयुष वेर्लेकर ४६, यश कसवणकर नाबाद १००, शिवेंद्र भुजबळ १, शौर्य जगलान १, लखमेश पावणे १३, शदाब खान २, उदित यादव नाबाद २३, कवलप्रीत सिंग १०-०-३७-४).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.