गोव्याने बुद्धिबळात चांगली प्रगती साधली आहे. कित्येक खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवत आहेत. महिला ग्रॅंडमास्टर भक्ती कुलकर्णी, ग्रॅंडमास्टर अनुराग म्हामल, लियॉन मेंडोसा यांच्यासह गोव्यातील अनेक बुद्धिबळपटूंनी आघाडीचे खेळाडू म्हणून देशात आपली प्रतिमा उजळ केली आहे. त्यात आता भर पडली आहे ती सर्वांत लहान वयात इंटरनॅशनल मास्टरचा मान पटकावलेल्या १२ वर्षीय एथन वाझ याची.
दि. ८ ऑगस्ट २०२३ रोजी एथन वाझने ‘आयएम’ (इंटरनॅशनल मास्टर) हा किताब मिळवला. आता त्याचे ध्येय सर्वांत तरुण ग्रॅंडमास्टर बनण्याचे आहे. सध्या तो श्रीलंकेत सुरू असलेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झाला आहे. खुल्या गटात त्याला १२वे तर १६ वर्षांखालील गटात पहिले मानांकन प्राप्त झाले आहे.
एथन वाझ याच्याशी संपर्क साधला असता त्याने सांगितले की, सर्वांत तरुण ग्रॅंडमास्टर बनण्यासाठी मला जास्तीत जास्त ग्रॅंडमास्टर नॉर्म स्पर्धांमध्ये खेळावे लागेल व तसा माझा प्रयत्न आहे. शिवाय जास्तीत जास्त पुरस्कर्ते मिळविण्याचाही आमचा प्रयत्न आहे. सध्या माझे स्टँडर्ड गटात २३९२ एलो, रॅपिडमध्ये २२८२ तर ब्लित्झमध्ये २३४७ एलो गुण आहेत.
मी माझ्या सभोवतालच्या खेळाडूंचे तंत्र पाहून स्वत:च्या तंत्रात अनेक बदल केले आहेत. या स्तरावर बुद्धिबळ खेळणे म्हणजे इतर कुठल्याही व्यावसायिक खेळात खेळण्यासारखेच आहे असे मला वाटते. लहान वयातच खेळताना मी अनेक आव्हानांना व कठीण प्रसंगांना तोंड दिले असल्याने एक परिपक्व खेळाडू बनण्याइतपत अनुभव मी एकवटलेला आहे. भविष्यातही माझा हा प्रयत्न असाच सुरू राहील, असे एथन म्हणाला.
एथन हा सां जुझे आरियल येथील द किंग्स स्कूलमध्ये आठवी इयत्तेत शिकत आहे. लहान वयातच त्याने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली आहेत. त्याचे सर्वांत तरुण ग्रॅंडमास्टर बनण्याचे ध्येय लवकरच साकार होवो, हीच आमची इच्छा व त्याला आजच्या राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त शुभेच्छा.
"चार ते पाच वर्षांत मी देश-विदेशात खूप खेळलो आहे. अनेकांकडून मला प्रेरणा मिळाली आहे. सर्वप्रथम मला शालेय, तालुका, राज्य, राष्ट्र व आंतरराष्ट्रीयस्तरावर अनेक प्रशिक्षक, ज्येष्ठ खेळाडू, शिक्षक, राज्य संघटनेचे मार्गदर्शन लाभले व लाभत आहे. मात्र माझे पालक माझ्यासाठी जो त्याग करत आहेत, ती गोष्ट आयुष्यात कधीही विसरणार नाही " असे तो म्हणाला.
एथनला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या बुद्धिबळ स्पर्धा खर्चीक झाल्याने त्याला अनेक स्पर्धांतून माघार घ्यावी लागते. मात्र त्याची जिद्द, मेहनत पाहून आम्ही त्याला मुळीच मागे पडू देणार नाही.
एडविन वाझ, (एथनचे वडील)
सर्वांत लहान ‘आयएम’ बनल्याने मला खूपच आनंद झालाय. आता ग्रॅंडमास्टर खेळाडूंबरोबर मी मनमोकळेपणाने खेळू शकतो एवढा आत्मविश्वास माझ्याकडे आहे. एखाद्या स्पर्धेची सुरूवात विजयाने झाली तर आपोआपच पुढील फेऱ्यांसाठी चांगला खेळ करण्याची जिद्द तयार होते.
एथन वाझ, बुद्धिबळपटू
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.