Indian Super League 2024-25
पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील पहिल्याच लढतीत जमशेदपूर एफसीकडून धक्कादायक पराभव स्वीकारल्यानंतर एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी आगामी लढतीसाठी संघात बदलाचे संकेत दिले असून आपला संघ पुढील सामन्यात निश्चितच उसळी घेईल असा विश्वासही व्यक्त केला.
एफसी गोवाचा स्पर्धेतील पुढील सामना शनिवारी (ता. २१) मोहम्मेडन स्पोर्टिंगविरुद्ध होईल. त्या लढतीसाठी कोलकत्यास रवाना होण्यापूर्वी मार्केझ यांनी गुरुवारी पर्वरी येथे पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी एकही आयएसएल सामना न खेळलेला १९ वर्षीय युवा मध्यरक्षक माल्सॉमत्लुआंगा याचीही उपस्थिती लक्षणीय ठरली. संघातील युवा खेळाडूंविषयी मार्केझ म्हणाले, की ‘‘मी युवा खेळाडूंना जास्त संधी देतो असे म्हटले जाते. युवा खेळाडू दर्जेदार असतील, त्यांनी खेळण्याची इच्छा बाळगली आणि सराव सत्रात प्रगती प्रदर्शित केल्यास त्यांनाही संधी मिळू शकते.’’
मागील सामन्यात आपल्या संघाने खराब खेळ करताना चुकांची पुनरावृत्ती केली, त्यामुळे लढतीनंतर राग अनावर झाल्याचा पुनरुच्चार ५६ वर्षीय मार्केझ यांनी केला. मात्र आता परिस्थिती निवळली असून संघातील साऱ्या खेळाडूंशी, तसेच पराभवाचे खापर फोडलेल्या परदेशी खेळाडूंशीही आपण सविस्तर बोललो असल्याचे स्पॅनिश मार्गदर्शकाने नमूद केले. कालपासून आपला संघ कसून सराव करत असून तयारीत मग्न आहे, त्यामुळे पत्रकार परिषदेसाठी नवोदित खेळाडूस पाचारण केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘‘पुढील लढतीसाठी संघाची लाईनअप नक्कीच मागील लढतीतील नसेल. काही बदल असतील. तरीही शनिवारी कोणता संघ खेळेल याबाबत मी अनभिज्ञ आहे. पहिल्या लढतीनंतर आमचे सराव सत्र खूपच चांगले झाले आहे. मोहम्मेडन स्पोर्टिंगने स्पर्धेत प्रथमच खेळत असूनही मागील लढतीत खूपच चांगला खेळ केला. निकालाच्या बाबतीत ते नशिबवान ठरले नाहीत. त्यांची कामगिरी मला भावली,’’ असे मार्केझ पत्रकार परिषदेत म्हणाले. संघाला आता सावरून खेळावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याची गरज एफसी गोवाच्या प्रशिक्षकाने प्रतिपादली.
एफसी गोवाचे पाच खेळाडू जखमी यादीत आहेत. यामध्ये बचावपटू संदेश झिंगन, मध्यरक्षक महंमद यासीर, आघाडीपटू इकेर ग्वॉर्रोचेना यांचा समावेश आहे. याविषयी मार्केझ म्हणाले, की ‘‘कदाचित पराभवामुळे अनुपलब्ध जखमी खेळाडूंची आठवण येत असावी. सामना न जिंकल्यामुळे हे साहजिकच आहे.’’ ऑक्टोबरमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांनिमित्त आयएसएल खंडित होईल, तोपर्यंत जायबंदी खेळाडू उपलब्ध नसल्याची माहिती त्यांनी दिली. यासीर खेळण्यास काही कालावधी आवश्यक असून बाकी खेळाडू स्पर्धा पुन्हा सुरू झाल्यानंतर पुनरागमन करू शकतात, असे ते म्हणाले.
एफसी गोवास सलामीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला, तरीही संघ मुसंडी मारू शकतो हा विश्वास व्यक्त करताना मार्केझ यांनी २०२१-२२ मध्ये आयएसएल करंडक जिंकलेल्या हैदराबाद एफसीचे उदाहरण दिले. मार्केझ तेव्हा हैदराबादचे प्रशिक्षक होते. ते म्हणाले, ‘‘तेव्हा हैदराबादला पहिल्या लढतीत चेन्नईयीनने हरविले होते. नंतर गतविजेत्या मुंबई सिटीला पराभूत केल्यानंतर हैदराबाद संघ सलग काही सामने अपराजित राहिला होता. त्याचप्रमाणे आता एफसी गोवास वैशिष्टपूर्ण खेळावे लागेल.’’
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.