
ISL 2024-25 FC Goa Vs Chennaiyin FC
पणजी: एफसी गोवा संघाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत अपराजित घोडदौड कायम राखताना शिल्डसाठी दावाही आणखी मजबूत केला. स्पर्धेत सलग १२ सामन्यांत गुण प्राप्त करताना त्यांनी शनिवारी चेन्नईयीन एफसीला २-० फरकाने नमविले.
फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या लढतीत एफसी गोवाला विजयाचे पूर्ण तीन गुण मिळवून देणारे दोन्ही गोल पूर्वार्धातील खेळात झाले.
इकेर ग्वॉर्रोचेना याने ११व्या मिनिटास रिबाऊंडवर आघाडी साधल्यानंतर, २६व्या मिनिटास आकाश संगवान याने डाव्या पायाच्या शानदार फटक्यावर एफसी गोवाची आघाडी बळकट केली. हा गोल कार्ल मॅकह्यू याच्या असिस्टवर झाला. यजमान संघाने आणखी काही संधी साधल्या असत्या, तर त्यांना याहून मोठा विजय शक्य झाला असता. मॅकह्यू सामन्याचा मानकरी ठरला.
स्पर्धेत सलग १२ सामने अपराजित असलेल्या एफसी गोवाने १७ लढतीत नऊ विजय नोंदविले असून त्यांचे आता ३३ गुण झाले आहेत. अव्वल स्थानावरील मोहन बागानच्या (३७ गुण) तुलनेत त्यांचे चार गुण कमी आहेत.
एफसी गोवाचा स्पर्धेतील पुढील सामना २ फेब्रुवारी रोजी जमशेदूपूर येथे जमशेदपूर एफसीविरुद्ध होईल. चेन्नईयीन एफसीचा हा आठवा पराभव ठरला. त्यामुळे प्ले-ऑफ फेरी गाठण्यासाठी त्यांना आणखीनच संघर्ष करावा लागेल हे निश्चित आहे. १८ सामन्यानंतर ते १८ गुणांसह दहाव्या स्थानी आहेत.
१२ अपराजित लढतीत एफसी गोवाचे ८ विजय, ४ बरोबरी
घरच्या मैदानावर एफसी गोवाचे यंदा ९ सामन्यांत ५ विजय
फातोर्ड्यात एफसी गोवा सलग ६ सामने अपराजित (५ विजय, १ बरोबरी)
आयएसएल स्पर्धेत सलग १७ गोल करण्याचा एफसी गोवाचा पराक्रम
एफसी गोवाचे यंदा स्पर्धेत एकूण ३२ गोल, ओडिशा एफसीपेक्षा २ गोल कमी
एफसी गोवाच्या ५ क्लीन शीट्स, घरच्या मैदानावर ३
चेन्नईयीनविरुद्ध २८ आयएसएल सामन्यांत एफसी गोवाचे १६ विजय
एफसी गोवा चेन्नईयीन एफसीविरुद्ध सलग ५ सामने अपराजित, त्यात ४ विजय, १ बरोबरी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.