ISL 2024-25: पुन्हा निराशा! एफसी गोवाचा पाच सामन्यांतील दुसरा पराभव; मुंबई सिटीचा निसटता विजय

Indian Super League 2024-25: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत यावेळच्या मोसमात आतापर्यंत निराशाजनक खेळ केलेल्या एफसी गोवास पुन्हा एकदा घरच्या मैदानावर फातोर्ड्यात विजयाविना राहावे लागले.
FC Goa VS Mumbai City
FC Goa VS Mumbai CityDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Super League 2024-25 FC Goa VS Mumbai City

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत यावेळच्या मोसमात आतापर्यंत निराशाजनक खेळ केलेल्या एफसी गोवास पुन्हा एकदा घरच्या मैदानावर फातोर्ड्यात विजयाविना राहावे लागले. देशाच्या पश्चिमेकडील पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध सलग १३ सामने अपराजित राहताना मुंबई सिटीने २-१ असा निसटता विजय नोंदवून यंदाचा पहिला विजय साकारला.

पेत्र क्रॅटकी यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने पूर्वार्धातच २-० अशी भक्कम आघाडी प्राप्त केली होती. पहिला गोल ग्रीक आघाडीपटू निकोलस कारेलिस याने नोंदविताना डच खेळाडू योएल व्हॅन निएफ याच्या फ्रीकिकवर छान हेडिंग साधले. नंतर ४०व्या मिनिटास स्वतः योएल व्हॅन निएफ याने सुरेख मैदानी गोल करून आयएसएल करंडक गतविजेत्यांची बाजू बळकट केली. अल्बेनियन खेळाडू आर्मांदो सादिकू याने ५५व्या मिनिटास एफसी गोवाची पिछाडी एका गोलने कमी केली. मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने नंतर बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न केले, पण मुंबई सिटीच्या बचावाने त्यांना दाद दिली नाही.

एफसी गोवाचा हा पाच सामन्यांतील दुसरा पराभव ठरला. दोन्ही लढती त्यांनी फातोर्ड्यातच गमावल्या असून या ठिकाणी अन्य एक लढत बरोबरीत राहिली आहे. त्यांचे आता पाच गुण कायम असून पुढील सामना चेन्नई येथे चेन्नईयीन एफसीविरुद्ध २४ ऑक्टोबरला होईल. दोन बरोबरी व एका पराभवानंतर मुंबई सिटीने विजय नोंदविताना चार लढतीतून एकूण गुणसंख्या पाचवर नेली आहे.

आम्ही ४५ मिनिटेच चांगले खेळतो; मार्केझ

मुंबई सिटीविरुद्धच्या पराभवानंतर निराश झालेले एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ म्हणाले, की ‘‘प्रत्येक सामन्यात आम्ही ४५ मिनिटेच (चांगले) खेळतो. पूर्वार्धात आमचा खेळ चांगला नव्हता हे स्पष्ट होते. मला वाटतं, उत्तरार्धात आम्ही बरोबरीसाठी लायक होतो. पूर्वार्धात आम्ही दोन मोठ्या चुका केल्या आणि मुंबई सिटीने दोन गोल केले. आम्ही सातत्य राखण्यात कमी पडत आहोत. संघ जेव्हा प्रत्येक सामन्यात दोन गोल स्वीकारतो तेव्हा मोसम उत्कृष्ट ठरणे अवघड आहे. सांघिक पातळीवर आम्हाला बचावात प्रगती साधणे आवश्यक आहे. स्पर्धेत वरच्या स्थानी असलेल्या संघांनी कमी गोल स्वीकारले आहेत.’’

FC Goa VS Mumbai City
GMC Theft: ‘गोमेकॉ’तील धक्कादायक प्रकार! 'ड्रग्स'साठी रुग्णांचे मोबाईल चोरणाऱ्यास अटक; तब्बल दहा मोबाईल जप्त

दृष्टिक्षेपात...

एफसी गोवाविरुद्धच्या २७ आयएसएल सामन्यात मुंबई सिटीचे १३ विजय

मुंबई सिटी १२ फेब्रुवारी २०२० पासून एफसी गोवाविरुद्ध सलग १३ सामने अपराजित (८ विजय, ५ बरोबरी)

एफसी गोवाविरुद्ध मुंबई सिटीचे आता सलग ३ विजय, गतमोसमातील दोन्ही प्ले-ऑफ उपांत्य लढतीत बाजी

आर्मांदो सादिकूचे यंदा स्पर्धेत ५ गोल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com