

India vs Bangladesh 2026 Schedule: भारत आणि बांगलादेश यांच्यातील बहुप्रतिक्षित क्रिकेट मालिकेबाबत अखेर महत्त्वाची माहिती समोर आली. दोन्ही संघांमधील ही द्विपक्षीय मालिका 2025 मध्ये पार पडणार होती, मात्र बांगलादेशमधील अस्थिर राजकीय परिस्थिती आणि वाढता तणाव लक्षात घेता ती त्यावेळी लांबणीवर टाकण्यात आली होती.
मात्र आता या मालिकेबाबत बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) एक मोठे वक्तव्य करत 2026 साठी आपले 'होम कॅलेंडर' प्रसिद्ध केले. या नवीन वेळापत्रकानुसार, भारतीय संघ ऑगस्ट ते सप्टेंबर 2026 या कालावधीत बांगलादेश (Bangladesh) दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. तथापि, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अद्याप या दौऱ्याला अधिकृतरित्या ग्रीन सिग्नल दिलेला नाही.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या 2026 च्या कॅलेंडरमध्ये भारत, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही बलाढ्य संघांच्या दौऱ्यांचा समावेश आहे. बांगलादेशमधील सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा विचार करता, तिथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन व्हावे यासाठी बोर्ड आतोनात प्रयत्न करत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ 28 ऑगस्ट रोजी बांगलादेशमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. या मालिकेची सुरुवात एकदिवसीय सामन्यांनी होईल, ज्याचा पहिला सामना 1 सप्टेंबर रोजी नियोजित आहे. त्यानंतर 3 सप्टेंबरला दुसरा आणि 6 सप्टेंबरला तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जाऊ शकतो. या एकदिवसीय मालिकेपाठोपाठ 9 सप्टेंबरपासून टी-20 मालिकेला प्रारंभ होईल, ज्यातील उर्वरित सामने 12 आणि 13 सप्टेंबरला होतील, असे बीसीबीच्या (BCCI) सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे ऑपरेशन्स हेड शहरियार नफीस यांनी या रिशेड्युल केलेल्या मालिकेबद्दल सकारात्मकता व्यक्त केली असली तरी, भारतीय संघाचा सहभाग हा पूर्णपणे बीसीसीआयच्या निर्णयावर अवलंबून आहे. सध्या बांगलादेशातील अंतर्गत तणाव आणि सुरक्षेचा प्रश्न पाहता भारतीय खेळाडूंना तिथे पाठवणे बीसीसीआयसाठी मोठे आव्हान ठरु शकते.
भारतीय क्रिकेट बोर्ड कोणताही दौरा निश्चित करण्यापूर्वी खेळाडूंच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते. त्यामुळे प्रत्यक्ष मालिकेपूर्वी बीसीसीआय एक स्वतंत्र सुरक्षा अहवाल मागवण्याची दाट शक्यता आहे. जोपर्यंत भारत सरकार आणि बीसीसीआय यांच्याकडून अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत या वेळापत्रकाला केवळ बांगलादेशचा प्रस्ताव म्हणून पाहिले जात आहे.
क्रिकेट चाहत्यांसाठी ही मालिका महत्त्वाची असली तरी, दोन्ही देशांमधील सध्याचे राजनैतिक संबंध आणि बांगलादेशातील हिंसाचाराच्या घटनांमुळे या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. जर परिस्थिती सुधारली नाही किंवा सुरक्षेची हमी मिळाली नाही, तर ही मालिका पुन्हा एकदा लांबणीवर पडू शकते किंवा तटस्थ ठिकाणी खेळवण्याचा विचार होऊ शकतो. सध्या तरी क्रिकेट विश्वाचे लक्ष बीसीसीआयच्या अधिकृत भूमिकेकडे लागले आहे, कारण बीसीसीआयचा होकारच या मालिकेचे भविष्य ठरवेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.