Ind Vs SA: भारत आफ्रिका सामन्यापूर्वी मोठी बातमी! 2 खेळाडू दुखापतग्रस्त; 'वॉशिंग्टन'लाही डच्चू? पंत, तिलकवरती नजर

Ind Vs SA 3rd ODI: भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये १-१ अशी बरोबरी झाली असून, आता दोन देशांमधील अखेरचा सामना विखाशापट्टणम येथे रंगणार आहे.
Rohit Sharma, Virat Kohli
Rohit Sharma, Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

विशाखापट्टणम: कसोटी मालिका गमावण्याची आपत्ती कोसळल्यानंतर भारतीय क्रिकेट संघावर एकदिवसीय मालिका गमावण्याचे संकट उभे राहिले आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये १-१ अशी बरोबरी झाली असून, आता दोन देशांमधील अखेरचा सामना विखाशापट्टणम येथे रंगणार आहे.

याप्रसंगी एकदिवसीय मालिका वाचवण्याचे आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे. अखेरच्या लढतीत विजय मिळवल्यास भारतीय संघाला मालिका विजयावर शिक्कामोर्तब करता येईल. रोहित शर्मा व विराट कोहली या अनुभवी खेळाडूंचा दमदार फॉर्म यजमान टीम इंडियासाठी मोलाचा ठरणार आहे. दक्षिण आफ्रिकन संघ पहिल्यांदाच भारतामध्ये एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.

विराट कोहली याने मागील तीन सामन्यांमध्ये दोन शतके व एक अर्धशतक झळकावले आहे. रोहित शर्मा याने मागील चार सामन्यांमध्ये एक शतक व दोन अर्धशतके साजरी केली आहेत. दोन्ही खेळाडूंचे वय वाढते असले तरी दोघांमधील धावांची भूक आजही कायम आहे. याच कारणामुळे अखेरच्या लढतीतही याच दोघांच्या कामगिरीवर भारतीय संघ अवलंबून असणार आहे.

विराट कोहली व रोहित शर्मा या दोघांनाही युवा खेळाडूंचे सहकार्य मिळायला हवे. ऋतुराज गायकवाड याने रायपूर येथील सामन्यात शतक झळकावताना धडाकेबाज खेळ करून दाखवला.

ऋतुराज गायकवाड याच्याप्रमाणे यशस्वी जयस्वाललाही आपली चमक दाखवायला हवी. डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांसमोर त्याची त्रेधातिरपीट उडत आहे. जेडन सील्स, मार्को यान्सन व नांद्रे बर्गर या डावखुऱ्या गोलंदाजांसमोर तो सातत्याने बाद झाला आहे.

आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत डावखुऱ्या गोलंदाजांसमोर तो ३० वेळा बाद झाला आहे. यामध्ये नऊ कसोटी, १९ टी-२० व दोन एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. संघ व्यवस्थापनाचे त्याच्या फॉर्मवर लक्ष असेलच. त्रुटीवर कामही करण्यात येत असेल. पर्यायी म्हणून ऋतुराज गायकवाड यालाही सलामी फलंदाज म्हणून पाठवण्यात येऊ शकते.

सुंदरऐवजी तिलक?

विखाशापट्टणम येथे दोन देशांमधील तिसरा एकदिवसीय सामना होत आहे. येथील खेळपट्टी फलंदाजांना पोषक अशी असते. त्यामुळे भारतीय संघामध्ये जादा फलंदाज खेळवण्याची शक्यता नाकारता येत नाही. वॉशिंग्टन सुंदर या अष्टपैलू खेळाडूच्याऐवजी तिलक वर्माला अंतिम ११ मध्ये संधी दिली जाऊ शकते.

तो मधल्या फळीत वॉशिंग्टन सुंदरपेक्षा अधिक चांगली फलंदाजी करू शकतो. तसेच पार्टटाइम गोलंदाजीही करू शकतो. अंतिम ११ मध्ये रिषभ पंतचाही समावेश झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही, मात्र तिलक वर्माला अधिक प्राधान्य असेल, शिवाय प्रसिध कृष्णा, हर्षित राणा या वेगवान गोलंदाजांना टिच्चून मारा करावा लागणार आहे. या दोन्ही गोलंदाजांना रायपूर लढतीत दक्षिण आफ्रिकन फलंदाजांना बांधून ठेवता आलेले नाही.

Rohit Sharma, Virat Kohli
IND vs SA, Playing XI: तिसऱ्या वनडेमध्ये कोणाची एन्ट्री, कोणाची एक्झिट? अशी असू शकते टीम इंडियाची प्लेईंग-11

१० पैकी सात सामन्यांमध्ये विजयावर मोहर

विशाखापट्टणम येथे २००५ पासून झालेल्या १० सामन्यांपैकी सात सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय संपादन केले आहेत. त्यामुळे भारतीय संघासाठी हे मैदान हितकारक ठरले, असे म्हणता येणार आहे, मात्र येथे झालेला अखेरचा सामना भारताने गमावला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला आहे.

Rohit Sharma, Virat Kohli
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; हार्दिक-गिलचे पुनरागमन

खेळाडूंच्या दुखापतीची चिंता

दक्षिण आफ्रिकन संघाने भारतामध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. आता एकदिवसीय मालिका विजयासाठी तेंबा बवुमाचा संघ सज्ज झाला आहे, मात्र सध्या या संघातील खेळाडूंच्या दुखापतीची चिंता त्यांना सतावत आहे.

नांद्रे बर्गर व टोनी दी जॉर्जी या खेळाडूंना रायपूरमधील लढतीत दुखापतीचा सामना करावा लागला होता. विशाखापट्टणममधील लढतीसाठी हे दोघेही तंदुरुस्त आहेत की नाही, याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com