
I League 2024 Dempo Club Vs Bangalore FC
पणजी: आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील स्पोर्टिंग क्लब बंगळूर संघाचा सध्याचा कमजोर फॉर्म लक्षात घेता धेंपो स्पोर्टस क्लबला अपराजित मालिका कायम राखण्याची संधी असेल. उभय संघांतील सामना शनिवारी (ता. ७) बंगळूर येथे खेळला जाईल.
समीर नाईक यांच्या मार्गदर्शनाखालील धेंपो क्लबने खेळलेल्या तीन सामन्यांत दोन विजय व एका बरोबरीसह सात गुणांची कमाई केली आहे. गुणतक्त्यात ते सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. स्पोर्टिंग क्लब बंगळूरला तिन्ही लढतीत पराभूत व्हावे लागले आहे. मागील लढतीत धेंपो क्लबने नामधारी एफसीवर १-० अशी मात केली. होती. आतापर्यंतच्या तीन सामन्यांत मिळून त्यांच्यासाठी सर्बियन मातिया बाबोविच याने दोन, तर पृथ्वेश पेडणेकर याने एक गोल केला आहे.
आय-लीग २ स्पर्धा जिंकून आय-लीग स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या स्पोर्टिंग क्लब बंगळूर संघ सध्या संघर्ष करताना दिसतआहे. मागील लढतीत त्यांना चर्चिल ब्रदर्सने ३-१ फरकाने हरविले होते. स्पर्धेतील तीन लढतीत त्यांनी आतापर्यंत फक्त एकच गोल केला आहे. गतमोसमातील आय-लीग २ स्पर्धेत बंगळूर येथे यजमान संघाने धेंपो क्लबवर ३-० असे विजयी वर्चस्व राखले होते, घरच्या मैदानावर धेंपो क्लबने १-० फरकाने विजय प्राप्त केला होता.
आताच्या आय-लीग मोसमाविषयी धेंपो क्लबचे प्रशिक्षक समीर नाईक यांनी सांगितले, की ‘‘यावेळची लीग पूर्णतः वेगळी आहे. सध्या आम्ही काही बाबींवर मेहनत घेत आहोत. सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. सांघिक एकसंधतेवर आम्ही भर दिला आहे.’’
दरम्यान, शनिवारी (ता. ७) कोझिकोड येथे चर्चिल ब्रदर्स व गोकुळम केरळा यांच्या सामना होणार आहे. प्रत्येकी तीन सामने खेळल्यानंतर सध्या गोकुळम केरळाचे पाच, तर चर्चिल ब्रदर्सचे चार गुण आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.