World Chess Championship 2025: 23 वर्षांनंतर 'विश्वकरंडक बुद्धिबळ' स्पर्धा गोव्यात रंगणार, 30 ऑक्टोबरपासून जगभरातील 206 खेळाडूंत चुरस

FIDE World Chess Championship 2025: तब्बल २३ वर्षांनंतर गोवा राज्य पुन्हा एकदा जागतिक बुद्धिबळपटाच्या नकाशावर झळकले आहे.
World Chess Championship 2025
World Chess Championship 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: तब्बल २३ वर्षांनंतर गोवा राज्य पुन्हा एकदा जागतिक बुद्धिबळपटाच्या नकाशावर झळकले आहे. ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत बार्देश तालुक्यात हडफडे येथील रिओ रिसॉर्ट येथे फिडे विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धा रंगणार आहे.

विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धा खूपच प्रतिष्ठेची मानली जाते. या स्पर्धेत जगभरातील २०६ खेळाडू भाग घेणार आहेत. विश्वकरंडक स्पर्धेतील अव्वल तीन खेळाडू २०२६ मधील कँडिडेट स्पर्धेसाठी पात्र ठरतील. कँडिडेट स्पर्धेतील विजेता जगज्जेतेपदासाठी आव्हान देतो. विश्वकरंडक स्पर्धेच्या पहिल्या फेरीत १ नोव्हेंबर रोजी सुरुवात होईल.

World Chess Championship 2025
Goa News: गणेश विसर्जनासाठी 'दृष्टी मरीन'चे 47 ठिकाणी जीवरक्षक राहणार तैनात; वाचा दिवसभरातील घडामोडी

२००२ मध्ये जागतिक ज्युनियर स्पर्धा

गोव्यात यापूर्वी डिसेंबर २००२ साली जागतिक ज्युनियर (२० वर्षांखालील) बुद्धिबळ स्पर्धा दोना पावला येथे झाली होती. तेव्हा खुल्या गटात आर्मेनियाचा लेव्हॉन ॲरोनियन विजेता ठरला होता. मुलींच्या गटात चीनच्या झाओ शुए हिला विजेतेपद मिळाले होते, तर भारतीय कोनेरू हंपी उपविजेती ठरली होती. आता २३ वर्षांनंतर राज्याला जागतिक पातळीवरील विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे.

उत्तर गोव्यातील बार्देश तालुक्यातील हडफडे येथील रिओ रिसॉर्ट येथे ही स्पर्धा खेळली जाईल. यापूर्वी २००२ मध्ये हैदराबाद येथे विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धा झाली होती आणि तेव्हा विश्वनाथन आनंद विजेता ठरला होता.

विश्वकरंडक स्पर्धेतील अव्वल तीन खेळाडू २०२६ मधील कँडिडेट स्पर्धेसाठी पात्र ठरतील. यामुळे गोव्यात होणाऱ्या स्पर्धेस महत्त्व प्राप्त झाले आहे. कँडिडेट स्पर्धेतील विजेता नंतर जगज्जेतेपदासाठी आव्हान देईल. ३० व ३१ ऑक्टोबर रोजी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विश्वकरंडक स्पर्धेच्या पहिल्या फेरीत १ नोव्हेंबर रोजी सुरवात होईल. स्पर्धेतील एकूण बक्षीस रक्कम २ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.

World Chess Championship 2025
Bajrang Dal Goa: 'ईद दिवशी जुलूसला परवानगी नको, कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास आम्ही जबाबदार नाही'! बजरंग दलाचा इशारा

प्राप्त माहितीनुसार, स्पर्धेचे एकूण अंदाजपत्रक सुमारे ४० कोटी रुपयांचे आहे. केंद्र सरकारव्यतिरिक्त अधिकांश आर्थिक भार गोवा सरकार उचलणार आहे. या कामी क्रीडामंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेले मार्गदर्शन मौल्यवान ठरले आहे.

राज्य सरकारने ग्वाही दिल्यानंतरच जागतिक बुद्धिबळ महासंघाने (फिडे) भारताला विश्वकरंडक स्पर्धेचे यजमानपद बहाल केल्यानंतर स्पर्धेचे शहर (होस्ट सिटी) या नात्याने गोव्याला पसंत दिली. अगोदर ही स्पर्धा नवी दिल्लीत होणे अपेक्षित होते, पण त्यांनी माघार घेतल्यानंतर गोवा सरकारने पुढाकार घेतला. याशिवाय तमिळनाडू व गुजरात राज्य सरकार स्पर्धा घेण्यास इच्छुक होते. गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर यांनी विश्वकरंडक स्पर्धा आयोजनात केलेला पाठपुरावाही महत्त्वपूर्ण ठरला.

प्रमुख खेळाडूंचा सहभाग

एकूण २०६ खेळाडूंच्या या स्पर्धेत जगज्जेता डी. गुकेश, मॅग्नस कार्लसन, फाबियानो कारुआना, आर. प्रज्ञानंद यांचा समावेश आहे. माजी जगज्जेता कार्लसन गोव्यात खेळण्याबाबत स्पष्टता नाही, तसेच सध्याचा जगज्जेता गुकेश कँडिडेट पात्रतेच्या प्रक्रियेत नाही, त्यामुळे तो गोव्यात खेळण्याबाबत अनभिज्ञता आहे. त्याचवेळी फिडे मानांकन रेटिंग वाढविण्यासाठी, तसेच बक्षीस रकमेच्या दृष्टीने गुकेश खेळण्याची शक्यताही व्यक्त होते.

अशी होईल स्पर्धा

कालावधी : ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर २०२५

२०६ खेळाडू, बाद फेरी पद्धतीने आठ फेऱ्या

प्रत्येक फेरीत क्लासिकल पद्धतीचे २ डाव, बरोबरी झाल्यास रॅपिड व ब्लिट्झ प्ले-ऑफ

पहिले ३ खेळाडू २०२६ मधील कँडिडेट स्पर्धेसाठी पात्र

World Chess Championship 2025
Chess World Cup Goa: दिल्ली नाही 'गोवा'! FIDE चेस विश्वचषक 2025 ची घोषणा; जाणून घ्या वेळापत्रक

‘हा भारतीय बुद्धिबळासाठी अभिमानाचा क्षण आहे आणि आमच्या चाहत्यांचा उत्साह तसेच आमच्या महासंघाची व्यावसायिकता प्रतिबिंबित करणारा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हा विश्वकरंडक देशभरातील लाखो लोकांना प्रेरणा देईलच, त्याचवेळी भारताचे आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून स्थानही अधिक मजबूत करेल. विश्वकरंडक २०२५ गोव्यात आयोजित करण्याचा सन्मान भारताला दिल्याबद्दल आम्ही फिडेचे मनःपूर्वक आभारी आहोत.’

- नितीन नारंग, अध्यक्ष, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com