FC Goa vs Al Nassr Match: एफसी गोवा-अल नस्सर सामन्याला ‘थंडा’ प्रतिसाद! स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने पाठ फिरवल्याने प्रेक्षकांनी घरीच पाहिली मॅच

Cristiano Ronaldo Absence: रोनाल्डो आला नसल्याने आणि या सामन्याची तिकिटेही महागडी असल्याने प्रेक्षकांनी हा सामना प्रत्यक्ष मैदानावर येऊन पाहण्याऐवजी घरी टीव्हीवर पाहणेच पसंत केले.
Cristiano Ronaldo Absence
Cristiano Ronaldo Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो येणार, अशी प्रारंभी हवा निर्माण केल्याने फातोर्डा येथे होणारा एफसी गोवा (FC Goa) आणि अल नस्सर एफसी यांच्यातील एएफसी लीग सामना हाय प्रोफाईल होणार, असे वातावरण आयोजकांनी निर्माण केले होते. पण रोनाल्डो आला नसल्याने आणि या सामन्याची तिकिटेही महागडी असल्याने प्रेक्षकांनी हा सामना प्रत्यक्ष मैदानावर येऊन पाहण्याऐवजी घरी टीव्हीवर पाहणेच पसंत केले.

वास्तविक फातोर्डा स्टेडियमची एकूण आसन क्षमता २० ते २५ हजार प्रेक्षकांना सामावून घेण्याची असताना आजच्या सामन्याला जेमतेम १० हजार प्रेक्षकांनीच हजेरी लावल्याने स्टेडियममधील काही स्टँड्समधील खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या. या सामन्याबाबत लोकांमध्ये फारशी उत्सुकताही दिसत नव्हती.

स्थानिक नागरिकांना मन:स्ताप

फातोर्डा (Fatorda) स्टेडियम परिसरात जे स्थानिक राहतात, त्यांच्या दैनंदिन कामात व्यत्यय येऊ नये, यासाठी त्यांना त्यांची वाहने घरापर्यंत नेता यावीत, यासाठी पास दिले होते. मात्र, या पासची संख्या पुरेशी नसल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागला. कित्येकांना आपली वाहने दूर पार्क करून पायी चालत घरी यावे लागले. स्थानिकांनी फातोर्डा पोलिस स्थानकात पाससाठी संपर्क साधला असता त्यांना, ‘पास संपले’ असे उत्तर मिळाले. यापुढे असे आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करायचे असल्यास स्थानिकांची काळजी आधी घ्यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

पोलिसांची तगडी फौज सामनास्थळी

हा सामना सुरू असताना स्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवला होता. मात्र, प्रेक्षकच कमी असल्याने पोलिसांवरही कुठला ताण नव्हता. आजच्या सामन्यासाठी चार पोलिस अधीक्षक, ११ उपअधीक्षक, १९ पोलिस निरीक्षक अशा बड्या अधिकाऱ्यांसह सुमारे ४०० पोलिस तैनात केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com