Deepti Sharma: दीप्ती शर्मा रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारी ठरणार पहिली भारतीय; ऑस्ट्रेलियन खेळाडूचा रेकॉर्डही धोक्यात

India vs Sri Lanka Women's T20: भारत आणि श्रीलंका यांच्यात सध्या 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे.
Deepti Sharma Record
Deepti SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

Deepti Sharma Record: भारत आणि श्रीलंका यांच्यात सध्या 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिले दोन सामने दिमाखात जिंकल्यानंतर आता भारतीय संघाची नजर मालिकेवर कब्जा करण्याकडे लागली आहे. या मालिकेतील तिसरा सामना तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला मालिका जिंकण्याची संधी तर आहेच, पण स्टार ऑलराउंडर दीप्ती शर्मा हिच्याकडे क्रिकेट विश्वात एक अभूतपूर्व विक्रम करण्याची मोठी संधी चालून आली आहे.

150 विकेट्सचा ऐतिहासिक टप्पा

दीप्ती शर्माने आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या अष्टपैलू खेळाने भारतीय संघाला अनेकदा विजय मिळवून दिला आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात दीप्तीला विश्रांती देण्यात आली होती, मात्र तिसऱ्या सामन्यात ती प्लेइंग-11 मध्ये परतण्याची दाट शक्यता आहे. जर दीप्तीला या सामन्यात संधी मिळाली, तर ती केवळ दोन विकेट्स घेऊन इतिहास रचू शकते. दीप्तीने आतापर्यंत 130 टी-20 सामन्यांत 148 विकेट्स घेतल्या आहेत. आणखी दोन विकेट्स घेताच ती टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 विकेट्स घेणारी पहिली भारतीय खेळाडू (पुरुष आणि महिला दोन्ही गटात) ठरेल. आतापर्यंत एकाही भारतीय गोलंदाजाला हा टप्पा ओलांडता आलेला नाही.

जागतिक क्रमवारीत नंबर 1 बनण्याची संधी

दीप्ती केवळ भारतीय विक्रमच नाही, तर जागतिक विक्रम मोडीत काढण्याच्या उंबरठ्यावर आहे. सध्या महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान ऑस्ट्रेलियाच्या मेगन शुट्टच्या नावावर आहे. मेगनने 151 विकेट्स घेतल्या आहेत. जर दीप्तीने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात 4 विकेट्स घेतल्या, तर ती मेगन शुट्टला मागे टाकून जगातील सर्वात यशस्वी महिला टी-20 गोलंदाज बनेल. दीप्तीची आतापर्यंतची सरासरी 18.99 असून तिचा इकॉनमी रेट 6.11 इतका प्रभावी आहे, जो टी-20 क्रिकेटमध्ये अत्यंत उत्कृष्ट मानला जातो.

मालिकेत भारताचे वर्चस्व

भारतीय संघाने (Team India) या मालिकेची सुरुवात धडाक्यात केली आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही विभागांत भारतीय महिलांनी श्रीलंकन संघाला निष्प्रभ केले आहे. तिसरा सामना जिंकल्यास भारत या मालिकेत 3-0 अशी अजेय आघाडी घेईल. दीप्ती शर्माच्या पुनरागमनामुळे भारतीय गोलंदाजी अधिक मजबूत होईल, ज्यामुळे श्रीलंकन फलंदाजांच्या अडचणी वाढू शकतात. तिरुवनंतपुरमची खेळपट्टी फिरकीपटूंना साथ देणारी मानली जाते, त्यामुळे दीप्ती शर्मा आपल्या ऑफ-स्पिनने श्रीलंकेच्या फलंदाजांना जाळ्यात ओढून हा ऐतिहासिक विक्रम नोंदवेल, अशी चाहत्यांना खात्री आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com