.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Manolo Marquez Statement After FC Goa East Bengal Football Match
पणजी: एफसी गोवाने ईस्ट बंगालला एका गोलने हरवून इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला, तसेच शिल्ड जिंकण्याचा दावाही कायम राखला, परंतु मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ पूर्ण समाधानी नाहीत, त्यांना संघाकडून अधिक सफाईदार खेळ अपेक्षित आहे.
सामन्यानंतर मार्केझ यांनी सांगितले, की ‘‘शक्यतो मोसमातील आमचा हा सर्वांत खराब सामना होता. मी समाधानी नाही. मी फार रागावलेलो नाही, पण नाराज आहे. जर तुम्ही अशा प्रकारे बहुतेक सामने खेळलात, तर पराभवाची शक्यता अधिक असेल.
स्पर्धेत काही चांगले सामने, सामान्य सामने आणि खराब सामने असतात, पण वाईट खेळ करत असतानाही टिकून राहणे महत्त्वाचे असते. दुसऱ्या सत्रात अधिक आक्रमकपणे त्यांनी (ईस्ट बंगाल) सातत्याने दबाव वाढवला. शेवटच्या पाच मिनिटांत पाच बचावपटूंसह बचाव करत होतो, मात्र आम्ही आघाडी टिकवू शकलो.”
मार्केझ यांनी स्पर्धेत चौथ्यांदा क्लीन शीट राखलेला गोलरक्षक ऋतिक तिवारी याचे कौतुक केले. एफसी गोवाचा हा पाच सामन्यांनंतरचा पहिला क्लीन शीट विजय ठरला, तर घरच्या मैदानावर आठ सामन्यांनंतरची पहिली क्लीन शीट होती. याविषयी मार्केझ म्हणाले, की ‘‘(ऋतिक) तिवारी प्रत्येक सामन्यात अप्रतिम बचाव करत आहे, पण जेव्हा तुमचा गोलरक्षकच प्रत्येक सामन्यात सर्वांत चांगला खेळाडू ठरतो, तेव्हा याचा अर्थ तुमचा संघ योग्य गोष्टी करत नाही. कधी ना कधी चूक होईल किंवा गोल होईल. तिवारी सध्या फारच चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मैदानावर तो खूप शांत असतो. तो संघासाठी खूप महत्त्वाचा आहे.”
एफसी गोवा संघ पुढील लढतीत हुकमी आघाडीपटू अल्बेनियाचा आर्मांदो सादिकू याला मुकणार आहे. ईस्ट बंगालविरुद्ध भरपाई वेळेत त्याला थेट रेड कार्ड मिळाले, त्यामुळे तो आगामी लढतीसाठी निलंबित असेल. सर्बियन देयान द्राझिचही जायबंदी आहे. त्यामुळे त्यांच्यापाशी सध्या चार परदेशी उपलब्ध आहेत. ईस्ट बंगालविरुद्ध कार्ल मॅकह्यू निलंबित असल्याने हीच स्थिती होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.