पणजी: एफसी गोवास पुन्हा एकदा बचावातील चुका नडल्या. त्यामुळे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत त्यांना चेन्नईयीन एफसीविरुद्ध 2-2 गोलबरोबरीवर समाधान मानावे लागले. सामना गुरुवारी चेन्नई येथे झाला.
विल्मार जॉर्डन गिल याने चेन्नईयीनला 11व्या मिनिटास आघाडी मिळवून दिल्यानंतर 45व्या मिनिटास उदांता सिंगच्या शानदार हेडिंगमुळे एफसी गोवाने बरोबरी साधली. बदली खेळाडू आर्मांदो सादिकू याने 51व्या मिनिटास पेनल्टी फटका अचूक मारल्यामुळे एफसी गोवास वर्चस्व प्राप्त झाले, मात्र बदली खेळाडू डॅनियल चिमा चुक्वू याच्या गोलमुळे चेन्नईयीनने 79 व्या मिनिटास 2-2 अशी गोलबरोबरी साधली.
बरोबरीमुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. चेन्नईयीनचे आता दोन विजय, दोन बरोबरी व एक पराभव या कामगिरीमुळे पाच लढतीतून आठ गुण झाले आहेत. एफसी गोवाची ही तिसरी बरोबरी ठरली. त्यामुळे अन्य एक विजय व दोन पराभवासह सहा लढतीतून त्यांचे सहा गुण झाले आहेत. एफसी गोवाचा पुढील सामना दोन नोव्हेंबर रोजी फातोर्डा येथे बंगळूर एफसीविरुद्ध होईल.
चेन्नईयीनच्या लुकास ब्राम्बिल्ला याचा फटका अडवताना एफसी गोवाचा बचावपटू जय गुप्ता याने चूक केली आणि रिबाऊंडचा लाभ उठवत विल्मार याने अगदी जवळून यजमान संघाला आघाडी मिळवून दिली. विश्रांतीपूर्वी आकाश संगवानच्या तीक्ष्ण क्रॉसपासवर उदांता याने शानदार हेडिंग साधताना प्रतिस्पर्धी गोलरक्षक समिक मित्रा याला चकवून एफसी गोवास बरोबरी साधून दिले.
पूर्वार्धात दुखापतग्रस्त झालेल्या बोर्हा हेर्रेरा याच्या जागी आलेल्या सादिकू याने उत्तरार्धातील सहाव्या मिनिटास पेनल्टी फटका मारताना चूक केली नाही. यावेळी चेन्नईयीनचा गोलरक्षक मित्रा याने देयान द्राझिक याला गोलक्षेत्रात पाडले होते.
विल्मारच्या जागी आलेल्या डॅनियल चुक्वू याने सामन्यातील 11 मिनिटे बाकी असताना कॉनर शिल्ड्स याच्या कॉर्नर फटक्यावर भेदक हेडरने यजमान संघाचा एक गुण निश्चित केला. यावेळी, एफसी गोवाचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमणी याने फटका अडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण चेंडू गोलरेषेच्या किंचित आत जाण्यापासून रोखू शकला नाही.
एफसी गोवा व चेन्नईयीन यांच्यातील 27 सामन्यांत तिसरीच बरोबरी.
आर्मांदो सादिकूचे स्पर्धेत आता 6 गोल, सलग 5 आयएसएल सामन्यांत गोल करणारा सादिकू एफसी गोवाचा पहिला खेळाडू.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.