पणजी: भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेत विजेतेपदासाठी इच्छुक असलेल्या एफसी गोवा संघाला आज बलाढ्य ओडिशा एफसीच्या खडतर आव्हानास सामोरे जावे लागेल. सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होईल.
एफसी गोवा स्पर्धेतील गतविजेते आहेत, मात्र गतमोसमात त्यांनी राखीव संघातील खेळाडू मैदानात उतरविले होते, तर यंदा ते आयएसएल संघाला तयारीच्या दृष्टीने पूर्ण ताकदीने खेळत आहेत. मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ भारतीय राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक या नात्याने जबाबादारी निभावत असल्याने शुक्रवारी अंतिम लढतीतही एफसी गोवा संघ साहाय्यक प्रशिक्षक गौरमांगी सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली खेळेल. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवा संघ पहिला सामना १७ सप्टेंबर रोजी फातोर्डा येथे जमशेदपूर एफसीविरुद्ध खेळेल. भाऊसाहेब बांदोडकर करंडक जिंकल्यास एफसी गोवाचा आयएसएल स्पर्धेपूर्वी आत्मविश्वास निश्चितच उंचावेल.
एफसी गोवाप्रमाणेच ओडिशा एफसीनेही स्पर्धेत चारही सामने जिंकले आहेत. सर्जिओ लोबेरो यांच्या मार्गदर्शनाखालील भुवनेश्वर येथील हा संघ मातब्बर असून ते शुक्रवारी विजेतेपदासाठी प्रमुख दावेदार असतील. उपांत्य फेरीत एफसी गोवाने अर्जेंटिनातील सीएसडी डिफेन्सा जस्टिसिया संघाला एका गोलने हरविले होते, तर ओडिशाने ऑस्ट्रेलियातील ए-लीग संघ ब्रिस्बेन रोअरचे कठीण आव्हान २-१ फरकाने परतावून लावले होते. त्यांचे दोन्ही गोल ह्युगो बोमोस याने केले होते.
यंदाच्या मोसमात करारबद्ध केलेला अल्बानियाचा ३३ वर्षीय आघाडीपटू आर्मांदो सादिकू याच्यावर एफसी गोवाची मदार असेल. त्याने जबाबदारी चोख निभावताना साखळी फेरीतील तिन्ही, तसेच उपांत्य सामन्यात मिळून चार गोल केले आहेत. तोच स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. बोर्हा हेर्रेरा याने दोन गोल नोंदविले आहेत. याशिवाय संघातील आणखी एक नवीन खेळाडू सर्बियन देयान द्राझिच लक्षवेधक ठरला आहे.
एफसी गोवा ः वि. वि. स्पोर्टिंग क्लब द गोवा ४-०, वि. वि. ब्रिस्बेन रोअर १-०, वि. वि. धेंपो स्पोर्टस क्लब २-१, वि. वि. सीएसडी डिफेन्सा जस्टिसिया १-०
ओडिशा एफसी ः वि. वि. सीएसडी डिफेन्सा जस्टिसिया २-१, वि. वि. चेन्नईयीन एफसी १-०, वि. वि. चर्चिल ब्रदर्स ६-०, वि. वि. ब्रिस्बेन रोअर २-१
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.