

पणजी: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यंदापासून २३ वर्षांखालील युवक क्रिकेट स्पर्धेच्या स्वरुपात बदल केला आहे. कर्नल सी. के. नायडू करंडक या चार दिवसीय सामन्यांच्या स्पर्धेसह टी-२० क्रिकेट स्पर्धाही घेण्यात येईल. गतमोसमापर्यंत एकदिवसीय सामन्यांची स्पर्धा घेण्यात येत होती.
२३ वर्षांखालील ‘स्टेट ए’ करंडक टी-२० स्पर्धेत गोव्याचा संघ एलिट ड गटात खेळेल. या गटात राजस्थान, मुंबई, बडोदा, गुजरात, छत्तीसगड, पुदुचेरी या संघांचा समावेश आहे. कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा एलिट क गटात समावेश असून मुंबई, राजस्थान, बडोदा, बंगाल, ओडिशा, हिमाचल प्रदेश व बिहार हे गटातील अन्य संघ आहेत.
बीसीसीआयच्या नियोजित वेळापत्रकानुसार, कर्नल सी. के. नायडू करंडक स्पर्धेतील गोव्याची मोहीम १२ ऑक्टोबरपासून बडोद्याविरुद्धच्या सामन्याने सुरू होईल. ३ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत हिमाचल प्रदेशविरुद्ध घरच्या मैदानावर चौथा सामना खेळल्यानंतर चार दिवसीय स्पर्धा खंडित होईल. त्यानंतर एक डिसेंबरपासून टी-२० करंडक स्पर्धा खेळली जाईल. कर्नल सी. के. नायडू करंडक स्पर्धेतील बाकी तीन सामने जानेवारी-फेब्रुवारीत खेळले जातील.
या स्पर्धेत गोव्याचा संघ ओडिशा, हिमाचल प्रदेश व बंगालविरुद्ध घरच्या मैदानावर खेळेल, तर बडोदा, बिहार, मुंबई व राजस्थानविरुद्धचे सामने अवे मैदानावर खेळले जातील.आहे गोवा क्रिकेट असोसिएशनने २३ वर्षांखालील क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी माजी रणजी अष्टपैलू अवधूत आमोणकर यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संभाव्य संघ सध्या दिल्लीत सराव करत आहे.
गतमोसमातील कामगिरी
गतमोसमात (२०२५-२६) गोव्याने कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेत सात सामन्यांत फक्त एक विजय नोंदविला होता. चार सामने गमावले होते, तर एक सामना अनिर्णित राहिला होता. एक लढतीत पावसामुळे निकाल लागू शकला नव्हता. २३ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गोव्याने सातपैकी सहा सामन्यांत पराभव पत्करला होता, फक्त एक विजय नोंदविला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.